_MPC_DIR_MPU_III

Pimpri : धोकादायक ! डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न मिळणा-या गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन माध्यमातून राजरोसपणे विक्री

पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनची अन्न व औषध प्रशासनाकडे कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधे घेतल्यास त्याचे संभाव्य धोके टाळता येतात. मात्र, डॉक्टरांच्या कुठल्याही सल्ल्याशिवाय ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ही औषधे राजरोसपणे मिळत आहेत. याचा महिलांच्या आरोग्यावर अतिशय भयंकर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या ऑनलाईन शॉपिंग साईट आणि अन्य संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी याबाबत पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून गर्भपाताची औषधे (अनवॉन्टेड किट) सहज उपलब्ध होत आहेत. त्यासोबत कोणतेही प्रिस्क्रिप्शन देण्यात येत नाही. याचा ही औषधे वापरणा-यांच्या शरीरावर दूरगामी परिणाम होणार आहे. याबाबत पडताळणी करून गर्भपाताची औषधे ऑनलाईन माध्यमातून विक्री करणा-या दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

विवेक तापकीर म्हणाले, “गर्भपात करणे हे कायद्याने गुन्हा आहे. नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच त्यांच्या चिट्ठीशिवाय गर्भपाताची औषधे मिळत नाहीत. नोंदणीकृत डॉक्टरांनी चिठ्ठी दिली तरी त्या चिठ्ठीची एक प्रत औषध विक्रेत्याकडे ठेवली जाते. ग्राहकास दिल्या जाणा-या दुस-या प्रतीवर औषधाची पूर्ण माहिती लिहून त्यावर दुकानदाराचा सही-शिक्का दिला जातो. एवढी सुरक्षा अशा प्रकारची औषधे विकताना घेतली जाते. मात्र, अॅमेझॉन सारख्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ही गर्भपाताची औषधे (mankind – unwanted kit) राजरोसपणे विकली जात आहेत.

जिल्ह्यातील अनेक औषध विक्रेत्यांनी गर्भपाताची औषधे ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मिळत असल्याची तक्रार केली. त्यानुसार 24 मे रोजी अॅमेझॉन साईटवरून हे औषध तक्रारीची शंका निवारण करण्यासाठी मागवण्यात आले. इतर साहित्याची विक्री केल्याप्रमाणे 29 मे रोजी गर्भपाताचे औषध घरपोच मिळाले. 398 रुपयांना मिळणारे औषध ऑनलाईन माध्यमातून केवळ 277 रुपयांना मिळाले. त्यावर बॅच नंबर तसेच अन्य महत्वाची माहिती काहीही देण्यात आली नाही. हे औषध उत्तर प्रदेशमधील दिबाई येथील मित्तल मेडिकलमधून पाठवण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा प्रयोग नागरिकांच्या जीवाशी खेळणारा आहे.

ड्रग अँड कॉस्मॅटिक अॅक्ट नुसार ई-फार्मसीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यात अशा प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही अशा प्रकारची जीवघेणी औषधे जाहिरात करून विकली जात आहेत. कायद्याचे बंधन ऑनलाईन औषधे विक्रेत्यांकडून पाळले जात नाही. यावर प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.