Dapodi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दापोडी परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद करावेत – रोहित काटे

Against the backdrop of corona, illegal trades in Dapodi area should be stopped immediately - Rohit Kate

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका प्रशासनाकडून त्याअनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, दापोडी परिसरात सध्या जुगार, मटक्यासारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षित अंतर पाळले जात नसून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे दापोडी परिसरातील अवैध धंदे पोलिसांनी त्वरित बंद करावेत, अशी मागणी स्थानिक नगरसेवक रोहित काटे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक काटे यांनी  म्हटले आहे की, पिंपरी -चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: झोपडपट्टी भागात हा आजार प्रामुख्याने पसरताना दिसत आहे.

दापोडी प्रभागात झोपडपट्ट्यांचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत नऊ ते दहा रुग्ण या परिसरात पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर, तीन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

महापालिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून प्रभागात कोरोना विरोधात जनजागृती करण्यात येत आहे. सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, या परिसरात जुगार, मटका सारखे अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. याबाबत भोसरी पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. मात्र, तरीदेखील हे अवैध धंदे सुरू आहेत.

दापोडीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर हे अवैध धंदे तात्काळ बंद होणे गरजेचे  असल्याचे नगरसेवक काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.