BNR-HDR-TOP-Mobile

Dapodi : पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात दापोडीकरांचा पिंपरीत निषेध मोर्चा

एमपीसी न्यूज – दापोडी झोपडपट्टीतील घरांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याच्या विकास प्रकल्पाच्या विरोधात जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी आज (शनिवारी)पिंपरीत निषेध मोर्चा काढला. प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले. पुणे मुंबई महामार्गावर आंदोलकांची मोठी गर्दी झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. निगडीहून पुण्याकडे येणारी वाहतूक मोरवाडी चौकातुन मासुळकर कॉलनीच्या दिशेने वळवण्यात आली आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज आंदोलन करण्यात आले. यामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वर्षानुवर्षे स्वतःच्या नावाने सातबारा व घरपट्टी भरत असलेल्या जयभीमनगर येथील नागरिकांच्या जागेवर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून दिशाभूल व फसवणूक होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. या पुनर्वसन प्रकल्पास त्यांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला जात असल्याने नागरिकांचा विरोध होत आहे.

येथील नागरिक अनेक वर्षांपासून येथे स्थायिक असून, अनेक घरमालकांच्या एक ते चार गुंठ्यांपेक्षा जास्त जागांचा मालकी हक्क आहे. यावर अनेकांची दुमजली घरे उभारली आहेत. काहींची जास्त चटई क्षेत्र असलेली घरे असून, त्यांना सरकारकडून केवळ 269 चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, दापोडी येथील झोपडपट्ट्यांसाठी होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असून नागरिकांच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती.

HB_POST_END_FTR-A2

.