Dapodi: दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – दापोडीतील घटना खेदजनक आहे. सकृत दर्शनी कंत्राटदार दोषी असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराकडून लेखी खुलासा मागविला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर अभियंता राजन पाटील आणि सहशहर अभियंता मकरंद निकम या दोघांची चौकशी समिती नेमली आहे. ही द्विसदस्यीय समिती सखोल चौकशी करुन सविस्तर अहवाल देणार आहे. महापालिका मृत्यू झालेल्या जवानाच्या पाठिशी असून कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

दापोडीत महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि ढिगाऱ्याखाली अडकल्याने नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.1) दापोडी येथे घडली. याप्रकरणी कंत्राटदार, सब कंत्राटदार, सुपरवायझर, महापालिकेच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, महापालिकेच्या अग्निशामक विभागात विशाल जाधव कार्यरत होते. त्यांची सेवा सात वर्ष पुर्ण झाली होती. महापालिकेच्या अग्निशामक विभागातील धोकादायक स्वरुपाचे काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सन 2013 मध्ये विमा उतरविण्यात आला आहे. त्या अंतर्गत कर्मचा-यांच्या कुटुंबियास दहा लाख रुपये रक्कम मिळणार आहे. जाधव यांच्या परिवाराच्या पाठिशी महापालिका उभी आहे. त्यांना आर्थिक मदत देण्यात येईल.

स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, अमृत योजनेअंतर्गत शहरातील मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्प राबविण्याचे काम पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर यांना 7 मार्च 2018 च्या आदेशाने देण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ मलनि:सारण नलिका टाकणेचे काम चालू आहे. हा अपघात रविवारी घडला आहे. निविदेतील अटी, शर्तीमध्ये स्पष्टपणे सुट्टीचे दिवशी ठेकेदाराने काम करुन नये, असे असताना ही ठेकेदाराने सुट्टीच्या दिवशी काम करण्यासाठी कामगारांना बोलविले. काम करताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. सुट्टीच्या दिवशी काम करण्याबाबत महापालिका अधिका-यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

मृत्यू झालेले जवान विशाल जाधव यांच्या विमा उतरविण्यात आलेला असून त्या अंतर्गत त्यांच्या कुटुंबियास दहा लाख रुपये आणि राज्य सरकारच्या वित्त विभागाकडील11 ऑगस्ट 2017 च्या आदेशान्वये राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत दहा लाख असे एकूण 20 लाख इतकी रक्कम विमा पोटी मिळणार आहे. जाधव यांची पत्नी सुशिक्षित पदवीधर आहे. त्यांनी महापालिका सेवेत नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर तातडीने त्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यासाठी आयुक्तांशी चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.