Dapodi Crime News : ‘मी पोलीस आहे, मी तुला ठोकीन’; रेल्वे पोलिसाची महिलेला धमकी

एमपीसी न्यूज – ‘तुला माहिती आहे का, मी पोलीस आहे. मी तुला ठोकीन. तुझे आयुष्य बरबाद करून टाकीन’ अशी धमकी एका रेल्वे पोलिसाने एका महिलेला दिली. तसेच आरोपी रेल्वे पोलिसासोबत त्याच्या रेल्वे पोलीस पत्नी आणि इतर लोकांनी पीडित महिलेला आणि तिच्या वडिलांना मारहाण करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

रेल्वे पोलीस सरिता कैलास जाधव, रेल्वे पोलीस कैलास जाधव, मिठी कैलास जाधव, विनायक मुलगंड, दिबोज्योती शहा, खन्ना, पगारे आणि इतर (सर्व रा. गणेश हेरिटेज, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत स्वाती दिलीप कदम (वय 34, रा. गणेश हेरिटेज, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना 30 एप्रिल, 25, 26 आणि 30 डिसेंबर 2020 रोजी गणेश हेरिटेज दापोडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती कदम लॉकडाऊनच्या काळात सामाजिक काम करत होत्या. त्यांच्या मोबाईलला नेटवर्क नसल्याने त्या त्यांच्या सोसायटीच्या टेरेसवर जाण्यासाठी सिक्युरिटीकडे चावी आणण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपी विनायक याने सोसायटीमधील 30 ते 35 ओकांना जमा केले. फिर्यादी यांच्या वयस्कर आईला खाली बोलावून विनायक, दिबोज्योती, खन्ना, पगारे आणि इतर लोकांनी त्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी केली.

त्यानंतर 25 डिसेंबर रोजी फिर्यादी यांचे वडील सिक्युरिटीकडे जाऊन सोसायटीमधील लिफ्ट कधी सुरु होणार, याबाबत चौकशी करत होते. त्यावेळी आरोपी विनायक याने फिर्यादी यांच्या वडिलांसोबत शाब्दिक बाचाबाची करून वाद केला. त्याचा व्हिडीओ बनवून सोसायटीच्या ग्रुपवर टाकला. याबाबत फिर्यादी यांनी विचारले असता, ‘तू फिजिकल असॉल्ट करते असे सीसीटीव्ही फुटेज वापरून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. 30 डिसेंबर रोजी फिर्यादी त्यांच्या घराच्या गॅलरीत फोनवर बोलत असताना सरिता हिच्या मुलीने त्यांचा व्हिडिओ बनवला. फिर्यादी यांनी मुलीला रोखले असता आरोपी सरिता हिने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

आरोपी कैलास याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत ‘तुला माहिती आहे मी पोलीस आहे. मी तुला ठोकीन. मी सटकलो कि तुला शूट करीन. तुझे आयुष्य बरबाद करून टाकीन. माझ्याकडे पिस्टल आहे’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. भासोरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.