Dapodi: ‘तुम्हाला माहिती काय मी कोण आहे’; मास्क न घालता अभिनेत्रीची अरेरावी

'Do you know who I am'; The actress's arrears without wearing a mask

पोलिसी खाक्या बसताच भरला पाचशे रुपये दंड

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क न परिधान करणा-यांवर महापालिकेची कारवाई सुरु असते….त्याचवेळी मोटारीतून जाणा-या एका मराठी अभिनेत्रीने मास्क परिधान केला नव्हता….त्यामुळे अधिका-यांनी या अभिनेत्रीला अडवत दंड भरण्यास सांगितले. त्यावर ‘मी कोण आहे’ असे म्हणत अभिनेत्रीने धिंगाणा घातला. ‘मी हिरोईन आहे, दंड भरणार नाही. कारवाई करायची तर माझ्या घरी पावती पाठवून द्या’ अशी अरेरावीची भाषा केली. मात्र, पोलिसी खाक्या बसताच तिने पाचशे रुपये दंड भरला. हा प्रकार बुधवारी (दि.24) दापोडी येथे घडला.

मास्क न घालणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे यांच्यावर महापालिका कारवाई करीत आहे. पोलिसांच्या मदतीने काल दापोडीत चार तास कारवाई करण्यात आली. यावेळी मास्क न घालता आलेल्या एका मराठी अभिनेत्रीने धिंगाणा घातला.

‘मी हिरोईन आहे, दंड भरणार नाही. कारवाई करायची तर माझ्या घरी पावती पाठवून द्या’, अशी अरेरावीची भाषा या अभिनेत्रीने अधिका-यांना केली. मोटारीतून जात असताना तिने मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी तिची मोटार थांबवून दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यावरून तिने थयथयाट केला.

त्यावर ‘आता कोर्टात या, दंड भरा’ असे पोलिसांनी सुनावले. ‘ये या गाडीचा नंबर घ्या. दोघांनी त्यांच्या घरी जाऊन गाडीचे आरसी बुक चेक करा’, असे पोलिस अधिकारी दोन पोलिसांना उद्देशून म्हणाले.

हे ऐकून, ‘भरला मी दंड, काही नका येऊ घरी’ असे म्हणून अभिनेत्री तावातावाने निघून गेल्याचे’ प्रत्यदर्शीने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.