Dapodi: ‘हॅरिस’चा समांतर पूल वाहतुकीसाठी खुला

बोपोडी सिग्नल चौकातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार

एमपीसी न्यूज – बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला बांधण्यात आलेला समांतर पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे वाहतूककोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले.

सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका आशा शेंडगे, स्वाती काटे, नगरसेवक राजू बनसोडे, माऊली थोरात, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रमोद ओंबासे, एकनाथ पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, आशा राऊत यावेळी उपस्थित होते.

  • पुणे शहराकडून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करताना नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. हॅरिस पुलावरील वाहतूककोंडी नित्याचीच बाब बनली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशस्त रस्त्यावरून वेगात येणा-या वाहनांना अरूंद असलेल्या बोपोडी सिग्नल चौकात ब्रेक लागत होता. त्यामुळे हॅरीस पुलाला समातंर पूल बांधण्याचे काम महापालिकने हाती घेतले होते.

या कोंडीतून मुक्‍तता करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्‍तरित्या हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा प्रकल्प मे 2016 मध्ये हाती घेतला होता. या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे.

  • तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. याचबरोबर पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी वाहनांना चार लेन उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा नवीन पूल 2 जुलै 2018 रोजी वाहतुकीला खुला करण्यात आला होता.

बोपोडीतील झोपडपट्टीच्या स्थलांतराला विलंब झाल्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे येण्याच्या पुलाच्या बांधकामाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुलाचे काम पूर्ण झाले असून आजपासून पूल वाहतुकीसाठी खूला केला आहे. त्यामुळे बोपोडीतील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.