Dapodi : प्रवासी भाड्याचे पैसे मागणा-या कारचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – कारमधून एका भाडेकरू प्रवाशाला सोडले. गंतव्यस्थळी पोहोचल्यानंतर प्रवासी सुट्टे पैसे आणतो म्हणून घरात गेला तो परत आलाच नाही. म्हणून पैसे मागण्यासाठी गेलेल्या कारचालकाला प्रवासी नागरिकासह घरातल्या लोकांनी बेदम मारहाण केली. प्रवाशाने कारचालकाच्या हातावर लोखंडी कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री साडेदहाच्या सुमारास गुरव पिंपळे रोडवर दापोडी येथे घडली.

गणेश धोंडिबा सोनटक्के (वय 27, रा. तरवडे वस्ती, हडपसर) असे जखमी कारचालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कार चालविण्याचे काम करतात. शुक्रवारी रात्री त्यांच्या कारला गुरव पिंपळे, दापोडी येथील एक भाडे आले. त्याला त्यांच्या नियोजित ठिकाणावरून घेऊन दापोडी येथे सोडले. सोडल्यानंतर प्रवासी ग्राहक सुट्टे पैसे आणतो म्हणून घरात गेला. बराच वेळ झाला तरी प्रवासी ग्राहक पैसे घेऊन आला नाही. म्हणून गणेश प्रवाशाच्या घरासमोर गेले.

प्रवाशाच्या घराची बेल वाजवली. घरातून दोनजण बाहेर आले. त्यांनी गणेश यांना ‘गाडी चालवताना फोनवर का बोलला’ असे म्हणून हाताने आणि बॅटने मारहाण केली. त्यानंतर प्रवासी ग्राहकाने लोखंडी कोयत्याने गणेश यांच्या हातावर मारले. यामध्ये गणेश जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.