Dapodi : उन्हाळ्यातील ‘गारेगार’ कविसंमेलनात रसिक तृप्त

एमपीसी न्यूज – उन्हाळा असह्य होत असला तरी त्यामागे वैज्ञानिक कार्यकारणभाव असतो. त्यासाठी आपल्या प्रदेशापेक्षा जास्त उन्हाची तुलना करून ऋतुचर्या सांभाळल्यास उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल, असे मत ज्येष्ठ कवयित्री वर्षा बालगोपाल व्यक्त केले.

सर्वत्र उन्हाची काहिली वाढली असताना शब्दधन काव्यमंचने दापोडी येथे रविवार (दि. २६ मे) साहित्यविश्वातील अभूतपूर्व असे ‘गारेगार कविसंमेलन’ आयोजित केले होते. जलकुंभाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

  • यावेळी सुरेश कंक म्हणाले, उन्हाळ्यात माणसाचा जठराग्नी अधिकच प्रदीप्त होत असल्याने प्रकृतीला योग्य असलेले कोणते पदार्थ आवर्जून खाणे आवश्यक आहे. हे प्रबोधन व्हावे म्हणून ‘गारेगार’ कविसंमेलनाचे आयोजन केले,” अशी भूमिका मांडली. यावेळी प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, प्रा. महादेव रोकडे, पंकज पाटील, सुहास घुमरे, सुरेश कंक, प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, ॲड. अंतरा देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.

ऐन दुपारी उन्हाच्या झळा वाढल्या असताना कलिंगडाच्या लाल फोडी, कोवळ्या काकडीच्या चकत्या आणि उसाचा मधुर रस यांचा आस्वाद घेत सुमारे चोवीस कवींनी आपल्या कवितांनी ‘गारेगार’ कविसंमेलनाची रंगत वाढवून रसिकांना तृप्त केले.

  • “चल गं राणी लई उकडतंय बागेमंदी जाऊ… कालाखट्टा, कोकम सरबत, कलिंगड खाऊ!” या निशिकांत गुमास्ते यांच्या कवितेने कविसंमेलनाचा प्रारंभ झाला. शोभा जोशी आणि नंदकुमार मुरडे यांच्या “ऋतू उन्हाळा… उन्हाच्या झळा…” या युगुलगीताने रंगत वाढवली.
_MPC_DIR_MPU_II

“नाजूक माझी तब्येत बाई थोडं समजून घ्या… मला गारेगार कलिंगड खायला द्या!” या संगीता झिंझुरके यांच्या कवितेला दाद मिळाली; तर डॉ. सुधीर काटे यांनी उन्हाळ्यात प्रकृतीची काळजी कशी घ्यावी हे कवितेतून सांगितले. कैलास भैरट यांची ‘आठवणीतला गारवा’ ही कविता बालपणीच्या आठवणी जागवणारी होती; तर ‘आला उन्हाळा’ या प्रतीकात्मक काव्यातून राजेंद्र घावटे यांनी मानवी जीवनावर भाष्य केले.

  • “बघा बघा आली ही गाडी लाल लाल कलिंगडाच्या घेऊनी फोडी…” या मधुश्री ओव्हाळ यांच्या बालगीतावर चिमुकल्यांनी ताल धरला. उन्हाचे विदारक रूप शरद शेजवळ यांनी अतिशय सुरेलपणे मांडले. मंगला पाटसकर यांचा “आला उन्हाळा… जिवाला सांभाळा!” हा काव्यमय संदेश, माधुरी विधाटे यांनी कवितेतून ग्रीष्मात फुलणाऱ्या फळा- फुलांचे केलेले वर्णन, देवेंद्र गावंडे यांनी, “आला उन्हाळा आला.

‘गारेगार खाऊ चला” असे दाखवलेले आमिष आणि अशोक कोठारी यांचे थंडपेयांचे गेय वर्णन रसिकांना भावले. अनिल दीक्षित, राजू जाधव, फुलवती जगताप, राधाबाई वाघमारे, शामराव सरकाळे, मयूरेश देशपांडे, उज्ज्वला केळकर, शिवाजीराव शिर्के, धनाजी घाडगे यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनाची सांगता प्रसिद्ध सिनेगीताच्या चालीवर आधारित गीताने करीत राज अहेरराव यांनी श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.

  • सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. मीरा कंक, प्रकाश घोरपडे, ओंकार जगदाळे, नंदकुमार कांबळे, अण्णा गुरव, शामराव साळुंखे, जयश्री गुमास्ते, शरद काणेकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. कवितांच्या दरम्यान भूतान देशाची रंजक माहिती कथन करीत राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.