Dapodi: मेट्रो स्थानकांचे काम ठप्प

मेट्रोने ठेका दिलेल्या दोन कंपन्यांनी 100 कामगारांचा पाच महिन्यांचा पगार थकवला

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोच्या दापोडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, पिंपरी आणि मोरवाडी स्टेशनचे काम ठप्प पडले आहे. मेट्रोने ठेका दिलेल्या दोन कंपन्यांनी सुमारे 100 कामगारांचा पगार पाच महिने थकवल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी महामेट्रोने दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली आहे. कामगारांनी महामेट्रोकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते दापोडी दरम्यान पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुस-या टप्प्यात पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोचे काम होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दापोडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, पिंपरी आणि एम्यायर इस्टेट (मोरवाडी) अशा पाच ठिकाणी मेट्रो स्थानके होणार आहेत, तर दुस-या टप्प्यात चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी स्थानकांचे नियोजन आहे.

पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या कामाचा ठेका दोन कंपन्यांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडून हे काम संथगतीने होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच होत होत्या. गेल्या काही दिवसांपासून मेट्रो स्थानकाचे काम पूर्णपणे बंद पडले आहे. जेमतेम पाया खोदून झाला असल्याचे सांगण्यात आले. पगार न मिळाल्याने कामगारांनी काम बंद केले आहे. ठेकेदार कंपन्यांनी जवळपास 100 कामगारांचे गेल्या नोव्हेंबरपासूनचे पगार थकवल्याची तक्रार आहे. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. मेट्रो प्रशासनापर्यंत हा वाद पोहोचला. तेव्हा त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली.

”कामगारांनी पुणे महामेट्रोकडे तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच महिन्यांचे पगार त्यांना मिळालेले नाहीत. या कामगारांचे पैसे देण्यात यावेत, असे मेट्रोकडून ठेकेदार कंपन्यांना सांगण्यात आले आहे. कामगारांचे थकवलेले पगार आणि संथगतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात मेट्रोने या कंपन्यांना अंतिम नोटीस बजावली आहे”, असे मेट्रोचे महाप्रबंधक (जनसंपर्क) डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.