Dapodi: ठेकेदार, सल्लागारावर महापालिका कारवाई करणार

सहशहर अभियंता मकरंद निकम यांची माहिती

एमपीसी न्यूज – दापोडीतील दुर्घटनेप्रकरणी अमृत योजनेच्या कामाचा सल्लागार आणि ठेकेदाराला नोटीस पाठविण्यात आली आहे. सात दिवसांत लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. कंत्राटदार पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फ्राक्‍ट्रक्‍चर लिमिटेडचे एम.बी. पाटील आणि युनिटी कन्स्ट्रक्‍शन सल्लागार महेश पाठक यांना काळ्या यादीत ठाकण्यात येणार आहे, अशी माहिती सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियान अंतर्गत (अमृत) पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्प राबविण्यात येत आहे. शहरातील 37 ठिकाणी जलनि:सारण व मलनि:सारणाचे पाइप लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या अटी – शर्तीनुसार 7 मार्च 2018 रोजी पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे मालक एम. बी. पाटील यांना कामाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी संपूर्ण काम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्‍यक आहे. 6 मार्च 2020 रोजी कंत्राटाची मुदत संपुष्टात येत असताना केवळ 40 टक्केच काम पुर्ण झाले आहे.

दापोडीत याच ठेकेदाराचे काम सुरू होते. पावसामुळे ते काम अर्धवट राहिले होते, ते पूर्ण करण्यास त्यांनी मुदतवाढ घेतली होती. त्यासाठी त्यांनी सहा मीटर खोल खड्डा खोदला होता. संबंधित सल्लागाराने त्या दुर्घटना झालेल्या स्थळाची पाहणी केली नव्हती. त्यामुळे सल्लागार युनिटी कन्स्ट्रक्‍शनचे महेश पाठक यांनाही महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यांना सात दिवसात खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

40 टक्केच काम पूर्ण झाल्याने महापालिकेने पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फास्ट्रक्‍चर या कंत्राटदाराला प्रति दिन एक लाख रुपये दंड आकारण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी 10 लाख रुपये दंड वसूल केला आहे, असे निकम यांनी सांगितले.

कासारवाडी सीमाभिंत प्रकरणी ठेकेदार दोषी
तीन महिन्यापूर्वी कासारवाडीत सीमाभिंत कोसळली होती. त्यामध्ये लोकेश ठाकूर या बालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेत ठेकेदाराची चूक आहे. त्यामुळे ठेकेदार दोषी आढळल्याचा अहवाला चौकशी समितीने दिला आहे. त्यांच्याकडून पीडीत कुटूंबाला आर्थिक भरपाई देऊ केली होती, असेही निकम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like