Dapodi News : दापोडी येथील आरक्षित भूखंडाची अतितातडीची मोजणी

एमपीसी न्यूज – दापोडी येथील 12 मीटर रुंद – रस्ता आणि बस टर्मिनससाठी बाधित होणारी जमीन संपादन करण्यासाठी या जागेची मोजणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, अतितातडीची सरकारी मोजणी करण्यासाठी येणाऱ्या शुल्कापोटी 2 लाख 82 हजार रुपये रक्कम नगर भूमापान कार्यालयाला देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मंजूर विकास योजनेतील दापोडी येथील सर्व्हे क्रमांक चारमध्ये 12 मीटर रुंद रस्ता आणि बस टर्मिनन्स या प्रस्तावाने बाधित जमीन संपादन करण्यात येणार आहे. हा भूसंपादनाचा प्रस्ताव आयुक्तांच्या 12 फेब्रुवारी 2020 रोजीच्या मंजूर प्रस्तावाच्या अनुषंगाने सादर केला आहे. या प्रस्तावाने बाधित जमीन संपादन करण्यासाठी महापालिका सभेत 7 सप्टेंबर 2021 रोजी मान्यता घेण्यात आली आहे.

या ठरावात टाऊन हॉलसाठी पाच हजार चौरस मीटर, तर बस टर्मिनल आणि 12 मीटर रुंद नियोजित रस्त्यासाठी 29 हजार 600 चौरस मीटर क्षेत्र संपादन करायचे आहे.

पुणे जिल्हाधिकारी यांनी 6 ऑगस्ट 2020 च्या आदेशानुसार, भूसंपादन विशेष अधिकारी पिंपरी यांची नवीन भूसंपादन कायद्यानुसार खासगी जमीन संपादनासाठी नियुक्ती केली आहे. भूसंपादन विशेष अधिकारी यांनी 12 मे 2021 च्या पत्रात रस्ता व आरक्षणाखालील जमीन संपादनासाठी संयुक्त मोजणी नकाशा व विवरणपत्र आवश्यक असल्याचे नगर भूमापन अधिकारी यांना कळविले.

त्यानुसार, 12 रुंद रस्त्यासाठी सरकारी मोजणी शुल्क 1 लाख 41 हजार रुपये आणि बस टर्मिनलसाठी मोजणी शुल्क 1 लाख 41 हजार रुपये अशी एकूण 2 लाख 82 हजार रुपये रक्कम द्यावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.