Dapodi : दापोडीमधून कांद्याने भरलेले क्रेट चोरीला

एमपीसी न्यूज – दापोडी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टेम्पोमधून कांद्याने भरलेले क्रेट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तसेच परिसरात लावलेल्या आठ रिक्षांचे पाठीमागील भाग कापून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.

इब्राहीम इस्माईल शेख (वय 32, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मधील न्यू गुलाब नगर सार्वजनिक शौचालयाजवळ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास रिक्षा आणि टेम्पो पार्क केले होते. अज्ञात चोरट्याने पार्क केलेल्या आठ रिक्षांचे पाठीमागील भाग कापून त्याचे नुकसान केले. एका रिक्षातील एक्साईड कंपनीची बॅटरी चोरून नेली. तर एका टेम्पोतील कांद्याचे क्रेट चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.