Dapodi: हॅरिस ब्रिजच्या समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात; एप्रिलअखेर होणार खुला

'ट्रॅफिक जाम'चा प्रश्न संपणार

एमपीसी न्यूज – हॅरिस पुलाला समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ही सर्व कामे एप्रिलअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळ-संध्याकाळ होणा-या प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. इतकेच नव्हे, तर बोपोडीकडून दापोडीकडे येताना होणा-या ‘ट्रॅफिक जाम’चा प्रश्नही निकालात निघणार आहे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणा-या ब्रिटीशकालीन हॅरिस पुलाला समांतर पूल उभारण्याचे काम करण्यात येत असून या नव्या पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे उद्योगनगरीच्या अनेक प्रवेशद्वारांपैकी सर्वाधिक वर्दळीचे समजले जाणारे, हे प्रवेशद्वार आता रुंदावले आहे. हा नवीन पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिकनगरीत प्रवेश करताना हॅरिस पुलावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आता संपुष्टात येणार आहेत.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॅरिस पुलापर्यंतचा त्यांच्या हद्दीतील रस्ता आठ पदरी केला आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत नाही. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरातील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पुलावर सतत वाहतूक कोंडी होते. त्यातून मुक्तता करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तरित्या हा प्रकल्प मे 2016 मध्ये सुरू केला.

या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. त्याचप्रमाणे पुण्याकडील पोच रस्त्याची लांबी 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी वाहनांना चार लेन उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून बोपोडीत प्रवेश करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर 2 जुलै 2018 रोजी हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे सीएमई प्रवेशद्वारापर्यंत होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. आता पुण्याकडून येणारा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास पुण्याकडून पिंपरीत येणा-या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.