Dapodi : धावत्या पीएमपीएमएल बसने घेतला पेट

एमपीसी न्यूज – धावत्या पीएमपीएमएल बसने अचानक पेट घेतला. बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर निघाला आणि लगेच बसने पेट घेतला. ही घटना आज (बुधवारी, दि. 27) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास दापोडी पिंपळे गुरव नदीवरील पूल महाराजा हॉटेल शेजारी पिंपळे गुरव येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पीएमपीएमएल बस (एम एच 12 / एच बी 1438) ही सीएनजी मॉडेल बस दापोडी पिंपळे गुरव या मार्गावरून जात होती. सकाळी पावणे अकरा वाजता दापोडी पिंपळे गुरव नदीवरील पुलाजवळ बस आली असता अचानक बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधील प्रवासी आणि चालक, वाहक खाली उतरले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र व रहाटणी उप अग्निशमन केंद्र येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी पाणी मारून बसची आग विझवली. अग्निशमन दलाने त्वरित आग विझवल्याने बसचा पाठीमागील भाग व सीएनजी फ्यूल टॅंक आगीपासून वाचविण्यात यश मिळाले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी या प्रसंगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले.

बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे सुरुवातीला धूर आला आणि त्यानंतर लगेच बसने पेट घेतला, असल्याचे बस चालक लक्ष्मण हजारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.