BNR-HDR-TOP-Mobile

Dapodi : आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी साहिल सय्यद या दिव्यांग खेळाडूची निवड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भारत व बांग्लादेशमध्ये 28 ते 31 मार्च दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सीरिजसाठी दापोडी येथील साहिल सय्यद या दिव्यांग खेळाडूची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. ही मालिका मुंबई आणि गोवा येथे होत आहे.

दापोडीतील 22 वर्षीय साहिल सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसला, तरी या मुलांप्रमाणे त्याच्या आवडीनिवडी, महत्त्वाकांक्षा आहेत. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड. विशेषत: क्रिकेटची. पण वडिलांना वाटे की तो कसा क्रिकेट खेळू शकेल ? पण साहिल मित्रांना जमवून चांगले क्रिकेट खेळू लागला. त्यामुळे वडिलांनी त्यासाठी हवे ते सर्व साहित्य त्याला घेऊन दिले. तो दहा वर्षाचा असताना क्रिकेट चांगला खेळू लागला. त्यानंतर त्याला आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. साहिलचे वडील सलीम दादाभाई सय्यद हे भारतीय सैन्यदलात 11 मराठा बटालियनमध्ये होते. त्यांनी 20 वर्षे सेवा केली. ते सैन्यदलात कार्यरत असल्याने साहिलची संपूर्ण जबाबदारी आई शबनम यांच्यावर होती. त्यांनीही न डगमगता साहिलच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आजोबा तय्यब जमादार यांचाही या यशात मोठा वाटा आहे.

सातत्याच्या सरावाने साहिल क्रिकेटमध्ये इतका पारंगत झाला, की जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये त्याने आपली चमक दाखविली. त्याच्या कौशल्याची दखल घेत त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. मेरठ येथे पार पडलेल्या इंडियन व्हिलचेअर क्रिकेट लीग स्पर्धेत महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात साहिलला ‘मॅन ऑफ द मॅच’चा बहुमान मिळाला होता.

बांग्लादेश क्रिकेट दौर्‍यासाठीही साहिलची संघात निवड झाली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्याला या दौर्‍याला जाता आले नाही. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साहिलची घोडदौड सुरु आहे. आता मुंबई आणि गोव्यात होत असलेल्या मालिकेत आम्ही सरस कामगिरी करीत विजयश्री खेचून आणू, असा विश्वास साहिलने व्यक्त केला. त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

साहिलने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट खेळामध्ये चमक दाखविली आहे. या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने सुवर्णपदक, रौप्यपदक, मॅन ऑफ द मॅच असा बहुमान मिळवला आहे. सध्या तो महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळत आहे. केवळ जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर साहिल मार्गक्रमण करीत आहे.

“आईमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. मला बाहेरगावी विविध स्पर्धांच्या निमित्ताने नेहमीच जावे लागते. या प्रवासाची जबाबदारी छावा मराठा संघटनेचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष राम जाधव उचलत असतात. तसेच अगदी दैनंदिन जीवनातही काही अडचण आली, मदत लागली तर राम जाधव धावून येतात” असे साहिल याने सांगितले. प्रहार अपंग आंदोलन संघटनेच्या सातारा अध्यक्षा सुरेखा सूर्यवंशीं यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरत आहे असे साहिल याने आवर्जून नमूद केले.

HB_POST_END_FTR-A4

.