Dapodi : दापोडी दुर्घटनेत अडकलेल्या मजुराचाही मृत्यू; मृतांची संख्या दोन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडलेल्या मजुराचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. यामुळे या दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास गणेश नगर दापोडी येथे घडली.

नागेश कल्याणी जमादार (वय 22), फायरमन विशाल हणमंतराव जाधव (वय 32, रा. मोशी. मूळ रा. सातारा) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ मागील दोन दिवसांपासून ड्रेनेजचे काम सुरु आहे. नागेश जमादार हा कामगार ते काम घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करत होता. त्याला रविवारी सुट्टी होती. तरीही एका दिवसाचा 700 रुपये पगार देण्याचे सांगून त्याला कामावर आणले. सायंकाळी सहाच्या दरम्यान तो ड्रेनेजच्या खड्ड्यात काम करत असताना अचानक वरून खड्ड्यात माती पडली आणि त्यात तो गाडला गेला. त्याला वाचविण्यासाठी सीताराम सुरवसे आणि ईश्वर बडगे हे दोघेजण गेले. त्याला बाहेर काढत असताना आणखी माती पडली आणि तिघेजण गाडले गेले.

याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्राचे कैलास वाघेरे, दिलीप गायकवाड, निखिल गोगावले, सरोज फुंडे, मुकेश बर्वे आणि विशाज जाधव या सहा जणांना घेऊन वाहनचालक गवारी यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. विशाल जाधव, निखिल गोगावले, सरोज फुंडे हे जवान अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरले. जवानांनी सीताराम आणि ईश्वर या दोघांना सुखरूप बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जमादार यांची माहिती एक नागरिक अग्निशामक दलाच्या जवानांना देत होता. त्यांना बाहेर काढत असताना बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे वरच्या ढिगा-यातून आणखी माती खाली ढासळली आणि नागेश आणि अग्निशमन विभागाचे तीन कर्मचारी पुन्हा गाडले गेले.

त्यापैकी फुंडे आणि गोगावले हे तोंडापर्यंत दबले गेले. त्यामुळे त्यांना श्‍वास घेता येत होता. तर विशाल यांच्या मानेवर मोठा दगड पडून मातीचा ढिगारा अंगावर पडला. अग्निशमन विभागाच्या तीन जवानांसह चारजण पुन्हा अडकले. याबाबतची माहिती वाहन चालक गवारी यांनी अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला दिली. अग्निशामक दलाचे जवान दबल्याची माहिती मिळताच उर्वरित सर्व उपकेंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्यास सुरवात केली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर गोगावले व फुंडे यांची सुखरूप सुटका केली. तर अडीच तासाने विशाल जाधव यांना शोधण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अग्निशामक दलाच्या मदतीला एनडीआरएफ आणि लष्कराची एक तुकडी दाखल झाली. तसेच अग्निशमन विभागाच्या पुण्यातील देखील काही पथकांना बोलावण्यात आले. रात्री अग्निशमन विभागासह एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरू केले. घटनास्थळी सेफ झोन तयार करून पथकाने शोधमोहीम सुरू केली. रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाल जमादार यांचा शोध लागला. मात्र ढिगा-यात अडकून त्यांचा देखील मृत्यू झाला होता.

शहीद विशाल जाधव यांना आज श्रद्धांजली अर्पण करणार

फायरमन विशाल जाधव यांना आज, सोमवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. विशाल जाधव 2012 साली पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागात भरती झाले होते. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. मुलीवर त्यांचा फार लळा होता. अग्निशमन दलात काम करताना मुलीचे किस्से सांगून ते आपला प्रत्येक दिवस आनंदात घालवत होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.