HB_TOPHP_A_

Dapodi : अपंगत्वावर मात करीत तरुणाची घोडदौड क्रिकेट, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगमध्ये चमक

128
एमपीसी न्यूज – नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील 21 वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट या खेळांमध्ये चमक दाखविली आहे. साहिल सय्यद असे या तरुणाचे नाव. या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, मॅन ऑफ द मॅच असा बहुमान मिळवला आहे. सध्या तो महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळत आहे. केवळ जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर साहिल मार्गक्रमण करीत आहे. सरकारने सर्वसामान्य क्रिकेटला दिली जाणारी मान्यता अपंगांच्या क्रिकेटलाही द्यावी, अपंग खेळाडूंना कायमस्वरुपी सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी अपेक्षा साहिल व्यक्त करतो.
HB_POST_INPOST_R_A
  
साहिलला जन्मत:च अपंगत्व आले आहे. डॉक्टरांनी तर तो वाचेल की नाही अशी चिंता व्यक्त केली होती. पण भारतीय सैन्यदलात सेवा बजावत असलेले साहिलचे वडील सलीम दादाभाई सय्यद हे हार मानायला तयार नव्हते. (साहिलचे वडील सलीम सय्यद हे सैन्यदलात आक्रमक 11 मराठा बटालियनमध्ये होते. त्यांनी 20 वर्षे सेवा भारतमातेची सेवा केली.) पोटच्या गोळ्याला त्यांना गमवायचे नव्हते. त्यांनी साहिलवर हवे ते वैद्यकीय उपचार केले. आणि साहिल पूर्णपणे बरा झाला. सलीम सय्यद यांना पत्नी शबनम यांची चांगली साथ लाभली. पती सैन्यदलात कार्यरत असल्याने साहिलची संपूर्ण जबाबदारी आई शबनम यांच्यावर आली. त्यांनीही न डगमगता साहिलच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मग साहिलच्या दिवसाची सुरुवातच आईच्या मदतीने होत होती. साहिलला शाळेत सोडणे, परत घेऊन येणे, त्याला खेळायला घेऊन जाणे, दवाखाना असे सर्वकाही त्या करायच्या.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, या उक्तीप्रमाणे साहिल सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसला, तरी या मुलांप्रमाणे त्याच्या आवडीनिवडी, महत्त्वाकांक्षा होत्या. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड. विशेषत: क्रिकेटची. पण वडिलांना वाटे की तो कसा क्रिकेट खेळू शकेल ? पण साहिल मित्रांना जमवून चांगले क्रिकेट खेळू लागला. त्यामुळे वडिलांनी त्यासाठी हवे ते सर्व साहित्य त्याला घेऊन दिले. साधारणत: तो दहा वर्षाचा असताना क्रिकेट चांगला खेळू लागला. त्यानंतर त्याला आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. सरावाने साहिल क्रिकेटमध्ये इतका पारंगत झाला, की जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये त्याने आपली चमक दाखविली. त्याच्या कौशल्याची दखल घेत त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात साहिलची झाली. त्यामध्ये तो उत्कृष्ट खेळतो आहे. गेल्या जानेवारी महिन्यात मेरठ येथे इंडियन व्हिलचेअर क्रिकेट लीग पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश हे तीन संघ सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात साहिलला ‘मॅन ऑफ द मॅच’चा बहुमान मिळाला होता. 3 डिसेंबर 2018 रोजी व्हिलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात ट्वेंटी ट्वेंटी (20-20) सामन्याचे आयोजन केले आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्र संघाकडून साहिलची निवड करण्यात आली आहे. येत्या जानेवारी 2019 मध्ये होणार्‍या इंडियन व्हिलचेअर क्रिकेट लीगसाठी खेळाडूंसाठी बोली लावण्यात येणार आहे. यामध्ये आपली निश्‍चित निवड होईल, असे साहिल सांगतो.
साहिलला क्रिकेटबरोबरच अ‍ॅथलेटिक (गोळा फेक), पॉवरलिफ्टिंग खेळाची आवड असून, यामध्येही त्याने नैपुण्य मिळविले आहे. अ‍ॅथलेटिकमध्ये त्याने सुवर्णपदक, पॉवरलिफ्टिंगमध्ये सिल्वर मेडल मिळविले आहे. बांग्लादेश क्रिकेट दौर्‍यासाठीही साहिलची संघात निवड झाली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्याला या दौर्‍याला जाता आले नाही. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साहिलची घोडदौड सुरु आहे.
मी अपंगत्वाकडे बघत बसलो नाही. अपंगत्व असल्याने काहीच केले नसते, तर आज मी या टप्प्यापर्यंत येऊच शकलो नसतो. माझ्या वाटचालीत आई-वडीलांची साथ हा माझ्यासाठी मोठा आधार आहे. आई माझे दैवत आहे. तिच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. मला बाहेरगावी विविध स्पर्धांच्या निमित्ताने नेहमीच जावे लागते. या प्रवासाची जबाबदारी छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम जाधव उलचत असतात. तसेच अगदी दैनंदिन जीवनातही काही अडचण आली, मदत लागली तर राम जाधव धावून येतात. प्रहार अपंग आंदोलन संघटनेच्या सातारा अध्यक्षा सुरेखा सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरत आहे, असे क्रिकेटर साहिल सय्यद म्हणाला.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: