Dapodi : सीएमईमध्ये ‘पूल बांधणी’च्या सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू; नऊ जवान जखमी

एमपीसी न्यूज – दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) सैनिकांच्या पूल बांधणीच्या सरावादरम्यान अपघात झाला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला असून नऊ जवान जखमी झाले आहेत. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

नायक भिवा खंडू वाघमोडे (वय 28, रा. दौंड), हवालदार संजीवन पीके (वय 29, रा. पलक्कड, केरळ) अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत.

तर, मेजर सुर्यजित सिंग, सुभेदार पी शंमुग्म, नायक डीसी शर्मा, हवालदार परमजीत सिंग, नायक गुरपीत सिंग यांच्यावर खडकी लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायक गोरे बीपी, नायक शरद खोले, नायक देवेंद्र सिंग बिष्ट यांच्यावर पुणे येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायक मंदीप सिंग या जवानावर सीएमई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील सीएमईमध्ये कॉम्पॅक्ट इंजिनिअरिंग इन्स्ट्रॅक्टर कोर्स सुरू आहे. या कोर्सअंतर्गत बेली सस्पेंशन ब्रिज तयार करण्याचे प्रशिक्षण सुरू होते. सकाळी क्लास झाल्यानंतर सव्वाअकराच्या सुमारास 104 जवान सीएमईमधील ब्रिज हार्ड मैदानावर जमले. ब्रिजचे प्रशिक्षण सुरू असताना लोखंडी ब्रिज कोसळून पावणेबाराच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये 11 जवान जखमी झाले. सर्व जवानांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी सर्व जवानांना प्रथम सीएमई मेडिकल इंस्पेक्शन रूममध्ये नेण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर काही जवानांना खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तर काहींना जवान कमांड हॉस्पिटल वानवडी येथे पाठवण्यात आले. उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला. तर नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Dapodi : सीएमईमध्ये पूल बांधणीच्या सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू; पाच जवान जखमी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.