Dapodi : चिमुकल्या मुलीच्या आठवणींमध्ये रमणारा अग्निशमन दलाचा जवान शहीद

एमपीसी न्यूज – आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे किस्से सांगत अग्निशमन दलात सर्वांशी मिळून मिसळून राहणारा जवान विशाल जाधव शहीद झाला. त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी (दि. 2) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विशाल हणमंतराव जाधव वयाच्या 25 व्या वर्षी त भरती झाले. ते सध्या फायरमन म्हणून काम करत होते. विशाल जाधव हे मूळचे सातारा येथील आहेत.

रविवारी सायंकाळी दापोडी येथे तिघेजण खोल खड्ड्यात अडकले असल्याची वर्दी मिळाली आणि विशाल त्यांच्या टीमसोबत तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. प्राणांचीही पर्वा न करता इतरांच्या मदतीला धावून जायचे, हे बाळकडूच जणू त्यांना मिळाले होते. म्हणूनच मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांना वाचविण्यासाठी ते तात्काळ धावले. ढिगा-यात अडकलेल्या दोघांना वाचवल्यानंतर तिस-याला वाचवताना वरून आणखी माती खड्ड्यात पडली आणि त्यातच विशाल त्यांच्या दोन साथीदारांसह गाडले गेले.

बघ्यांच्या गर्दीने माती ढासळली असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. भावनाशून्य आणि विचारहीन लोकांमुळे हा प्रकार घडला असल्याचेही म्हटले जात आहे. मातीच्या ढिगा-यात अडकलेल्या तिघांपैकी दोघांना सुखरूप काढल्यानंतर तिस-याला काढताना माती पडली. त्यात विशाल कमरेच्या वर गाडले गेले आणि त्यांच्या मानेवर इजा झाल्याने ते जास्तच अडकत गेले. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उपकेंद्रातील जवान मदतकार्यासाठी धावले. कारण, असा प्रसंग पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या स्थापनेनंतर प्रथमच घडला होता. घटना घडल्यानंतर अडीच तासांनी त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यावेळी त्यांची हालचाल पूर्णतः थंडावली होती.

विशाल यांना दोन वर्षांची मुलगी आहे. मुलीवर त्यांचा फार लळा होता. अग्निशमन दलात काम करताना मुलीचे किस्से सांगून ते आपला प्रत्येक दिवस आनंदात घालवत होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.