BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : खर्च महापालिकेचा अन्‌ जाहिरात आमदाराची – दत्ता साने 

एमपीसी न्यूज – भारताच्या हवाई दलाच्या भरती अभियानाच्या भोसरीत होणा-या कार्यक्रमाचा महापालिका खर्च करत असताना कार्यक्रमाची प्रसिद्धी भोसरीचे आमदार महेश लांडगे घेत आहेत. त्यांना एवढीच मिरविण्याची हौस असेल. तर, सर्व खर्च वैयक्तीकरित्या करावा आणि जाहिरात करावी, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. तसेच राष्ट्रहिताच्या कार्यक्रमात महापालिकेच्या खर्चावर जाहिरातीची पोळी भाजून घेणे आमदारांना शोभत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

भोसरी येथे 21 ते 29 जुलै दरम्यान भारताच्या हवाई दलाचे मोठ्या प्रमाणात भरती अभियान होणार आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृह व भोसरी गावजत्रा मैदानात हे अभियान होणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रहिताचा असल्याने महापालिकेमार्फत मदत म्हणून मांडव विद्युत व्यवस्था तात्पुरती ध्वनी व प्रकाश व्यवस्था करण्याकरीता सुमारे 50 लाख 2 हजार 244 रुपये देण्यात आले आहेत.

दत्ता साने म्हणाले, हा कार्यक्रम राष्ट्रहिताचा तसेच स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत खर्च करण्यास काहीच हरकत नाही. परंतु, प्रत्यक्षात महापालिका खर्च करणार असताना या कार्यक्रमाची प्रसिद्धी भोसरीचे आमदार महेश लांडगे घेत आहेत. तशा आशयाच्या जाहिराती फ्लेक्स, फेसबूक, व्हॉटस अॅपसह इतर सोशल मीडिया माध्यमांवर फिरत आहेत. त्यावर कुठेही महापालिकेचा उल्लेख नाही.

आमदारांना एवढीच जर मिरविण्याची हौस असेल. तर, त्यांनी हा सर्व खर्च वैयक्तीकरित्या करावा आणि खुशाल जाहिराती कराव्यात. आम्हाला त्याबद्दल आक्षेप असणार नाही. परंतु, महापालिकेच्या खर्चावर स्वत:च्या जाहिरातीची पोळी भाजून घेणे, तेही राष्ट्रहितासारख्या कार्यक्रमात हे आमदारांना शोभत नाही, असे साने यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी दर्शनी भागावर हा कार्यक्रम महापालिकेच्या आर्थिक सहाय्यातून होत आहे. अशा आशयासह महापालिकेच्या बोधचिन्हासह ठळक अक्षरात फलक लावण्याची मागणी साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3