Maval : पंचायत समिती सदस्यपदाचा दत्तात्रय शेवाळे यांनी दिला राजीनामा

एमपीसी न्यूज – नुकताच बाळासाहेब नेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि जिल्हा बँक व दूध संघ संचालक पदाचा राजीनामा दिला. आणि राजकारणापासून अलिप्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्या पाठोपाठ लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांनी पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देत अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. आणि आता नेवाळे त्यांचे भाचे आणि मावळ पंचायत समितीचे सदस्य – गटनेते दत्तात्रय नाथा शेवाळे यांनी आज सोमवार ( दि. १४ ) रोजी सभापती यांच्याकडे राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

दत्तात्रय शेवाळे यांनी मावळ विकास गटातील वडेश्वर पंचायत समिती गणामधून २०१७ साली त्यांनी पंचवार्षिक निवडणूक लढवली होती. आणि ते विजयी होऊन पक्षाच्या गटनेते पदाची जबाबदारी सांभाळली. आपल्या भागासह तालुक्यात अनेक विकास कामे करण्यात त्यांचा हातभार होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब नेवाळे प्रबळ इच्छुक होते. त्यांनी अनेक वर्ष संघटनेसाठी, समाजासाठी काम केले तरी त्यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी आयात उमेदवाराला प्राधान्य दिले. यात पक्षाने काय निकष लावले, सध्या पैशांवर राजकारण सुरु असून मावळचा उत्तरप्रदेश होण्याच्या वाटेवर असल्याची टीका शेवाळे यांनी केली. शरद पवार यांनी नेवाळे साहेबांवर टीका केली आणि म्हणून नेवाळे यांनी राजकारणातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. मी नात्याने जरी त्यांचा भाचा असलो तरी पहिला पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांनी आम्हाला घडवले आहे. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी सहमत राहून मी माझ्या सर्व पदांचा आज राजीनामा देत असल्याचे मावळ पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.