Chakan : घरगुती वादातून निर्दयी सासरच्यांनी केला सुनेचा खून

एमपीसी न्यूज – घरगुती भांडणाच्या रागातून पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मिळून सुनेचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 16) सकाळी सातच्या सुमारास खेड तालुक्यातील शिवे येथे घडली.

सुमन लहू शिवेकर (वय 50, रा. वासुली, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती प्रकाश रबाजी कारके, सासू बायडाबाई रबाजी कारके, सासरा रबाजी चिंधू कारके आणि दीर संतोष रबाजी कारके (सर्व रा. शिवे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शना प्रकाश कारके (वय २५) असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना आणि प्रकाश यांचा 2011 साली विवाह झाला. लग्नानंतर दोन वर्ष सुखाने संसार सुरु होता. त्यानंतर दर्शना आणि सासरच्या मंडळींची सतत किरकोळ कारणांवरुन भांडण होत होते. सासरची मंडळी दर्शनाला वारंवार त्रास देत होते.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास सासरच्या लोकांनी चाकूच्या सहाय्याने तिचा गळा चिरून खून केला. तिचा मृतदेह भामा आसखेड धरणाच्या आटणीच्या पाण्यात टाकला. त्यानंतर सर्व आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दर्शनाचा मृतदेह घरी आणला. त्यानंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. याबाबतीत संशय आल्याने दर्शनाच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी सासरच्या मंडळींकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्यांनीच हा खून केला असल्याचे कबूल केले. यावरून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.