Daund Crime News : कारला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला चाकूने भोकसले

ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर घडली.

एमपीसी न्यूज – बार्शी येथून कुटुंबासह पुण्याकडे येत असलेल्या एका कारला दुसऱ्या कारने कट मारला. कट मारणारी कार पुढे जाऊन थांबली. त्यानंतर कार चालकाने कट मारणा-या कार चालकाला कार हळू चालवण्याचा सल्ला दिला. यावरून कार चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून समजावणा-या कार चालक तरुणावर चाकूने भोकसून खुनी हल्ला केला.

ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री सव्वा अकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील रावणगाव जवळ सोलापूर-पुणे महामार्गावर घडली.

आकाश रावसाहेब भराटे (वय 28, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी आकाशच्या आई अनिता रावसाहेब भराटे (वय 48) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अनिल शिवाजी बनसोडे (रा. अफजलपुर ता. गुलबर्गा, कर्नाटक. सध्या रा. कांदिवली- ईस्ट मुंबई) आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आकाश याची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे डिलिव्हरी झाली. तिला पाहण्यासाठी शनिवारी दुपारी आकाश आणि त्यांचे कुटुंबीय चिंचवड येथून बार्शीला त्यांच्या कार (एमएच 14 / एचपी 0097) मधून गेले.

आकाश याला मुलगी झाली आहे. मुलीला पाहून तसेच पत्नी वैभवी यांची भेट घेऊन आकाश त्यांची फिर्यादी आई अनिता, अनिता यांची मोठी सून पूजा आणि त्यांचा मुलगा हे पुण्याच्या दिशेने परत निघाले.

त्यांची कार दौंड तालुक्यातील रावणगावच्या हद्दीत आली असता एका कारने (एमएच 48 / एफ 2374) आकाश यांच्या कारला कट मारला. त्या कारने पुढे आणखी एका कारला कट मारला आणि कट मारणारी कार पुढे जाऊन थांबली.

_MPC_DIR_MPU_II

तिथे थांबून आकाश यांनी कट मारणा-या कार चालकाला ‘कार सावकाश चालवा, माझ्या कारमध्ये फॅमिली आहे’ असे समजावून सांगितले.

त्यानंतर कट मारणा-या कारमधून आरोपी उतरले. त्यांनी फिर्यादी अनिता आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना शिवीगाळ केली. एकाने आकाशच्या पोटात चाकू खुपसला.

अन्य आरोपींनी फिर्यादी आणि अन्य नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ‘एका एकाला खल्लास करू टाकतो’ अशी धमकी देत आरोपी पाटसच्या दिशेने निघून गेले.

पाटस टोलनाक्याच्या अलीकडूनच आरोपींनी कार वळवून पुन्हा सोलापूरच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. जखमी आकाश देखील त्यांच्या कारमधून जखमी अवस्थेत आरोपींच्या कारचा पाठलाग करीत होते.

कुरकुंभ गावाजवळ आरोपींची कार बंद पडली. आकाश यांच्यासोबत अन्य एका कारला आरोपींच्या कारने कट मारला होता. दुसरी कार देखील आरोपींचा पाठलाग करीत होती.

दरम्यान, आकाश यांचा रक्तस्त्राव वाढत असल्याने त्यांना भिगवण येथील आयसीयू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आकाश यांच्या आई अनिता यांनी याबाबत दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान पाठलाग करत असलेल्या दुस-या कारमधील व्यक्तींनी आरोपी अनिल बनसोडे याला पकडले आहे.

दौंड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.