Daund Crime News : कोरोना टेस्टचा अहवाल देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

एमपीसीन्यूज : कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. दौंड येथील शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला.

मिलिंद दामोदर कांबळे ( वय 38) असे पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. दौंड येथील शासकीय रुग्णालयात कांबळे हे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ते काम करतात. या रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली जाते.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना चाचणी करून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. यातील तक्रारदारांनी आपल्या 19 कर्मचाऱ्यांची दौंड येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाची रॅपिड अँटीजन टेस्ट केली होती. या चाचणीचा अहवाल देण्यासाठी आरोपीने प्रत्येक टेस्ट मागे शंभर रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली होती.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये आरोपीने लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. तिकडे आरोपीने तडजोडी अंती दीड हजार रुपये स्वीकारण्याचे ठरवले. त्यानंतर ही लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.