Daund Crime News : ‘एलसीबी’च्या छाप्यात दोन चंदन तस्कर जेरबंद; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जप्त केलेला मुद्देमाल यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर या गुन्ह्यातील तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसीन्यूज : पुणे ग्रामीण पोलीस दलातील एलसीबीच्या पथकाने दौंड तालुक्यातील दापोडी गावात छापा टाकून दोन चंदन तस्करांना अटक केली. या दोघांकडून चंदनाची लाकडे आणि रोकड, असा एकूण सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, एक आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. आज, शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

रामदास शहाजी माने (वय 25, रा.मुर्टी, उंबरवाडा, ता.बारामती, जि.पुणे) व राजू बाबू शिंदे (वय 30, रा.दापोडी, वैदवाडी, ता.दौंड, जि.पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर रमेश बाबू करडे (रा.दापोडी, ता.दौंड, जि.पुणे) हा  चंदनाच्या लाकडाचे पोते तेथेच टाकून घटनास्थळावरून पसार झाला.

पुणे  जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस पथकाची नेमणूक केली आहे.

या पथकातील पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड आदी आज, शनिवारी यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दौंड तालुक्यातील मौजे दापोडी येथील देशमुख वस्ती येथे दोन व्यक्ती  रमेश करडे यास चंदनाची लाकडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली.

त्यानुसार या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत चंदनाच्या लाकडाची विक्री करण्यासाठी आलेल्या रामदास माने आणि राजू शिंदे या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. तर रमेश करडे हा हातातील चंदनाच्या लाकडाचे पोते तेथेच टाकून पळून गेला.

पोलिसांनी अटक ओपींकडून 1  मोटरसायकल, 2 मोबाईल, 18 हजार 500 व 1  लाख 54 हजार रुपयाची चंदनाची 22 किलो वजनाची लाकडे, असा एकूण 2 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त केलेला मुद्देमाल यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर या गुन्ह्यातील तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.