Pune News : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 20 ऑक्टोबरपासून पुणे ते दौंड लोकल धावणार

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे ते दौंड लोकल ट्रेन सेवा दिनांक 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. या लोकल ट्रेन ने प्रवास करण्यासाठी ई-पास असणं आवश्यक असून प्रवाशांना एक क्यू आर कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रत्येक फेरीनंतर रेल्वेगाड्यांचे पुणे महानगर पालिकेकडून तर दिवसअंती रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक रेल्वेगाडीचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. 

अत्यावश्यक सेवा पुरवणा-या कर्मचा-यांसाठी पुणे ते दौंड सकाळी सहा वाजता व संध्याकाळी 5.20 वा तसेच दौंड ते पुणे सकाळी 7.45 वा. व संध्याकाळी 7.15 वा अशी लोकल ट्रेन सेवा दिनांक 20 ऑक्टोबर पासुन सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. यासंबंधी  पोलीस प्रशासन व इतर संबंधित वरीष्ठ अधिका-यांची बैठक नुकतीच पार पडली.

दरम्यान, सर्व स्थानकांवर येणा-या जाणा-या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कर्मचा-याची थर्मल स्कॅनींगद्वारे तपासणी केली जाणार आहे. स्थानिक परीसरामध्ये येणारे व जाणारे मार्ग निश्चित केले जातील व रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर परिसरामध्ये कोणतेही फेरीवाले बसणार नसल्याचे प्रशासनाने म्हंटले आहे. रेल्वे स्थानक परिसरामध्ये स्थानिक नगरपालिका अधिका-यांकडून दिशादर्शक फलक लावण्यात येतील व स्थानकाच्या संपूर्ण परिसराचे बॅरीकेटींग करण्यात येणार आहे. पुणे महानगर पालिकेच्या वतीने सर्व रेल्वे स्थानकावर समन्वय अधिकारी नेमले जाणार असून पुणे पोलीस विभाग व पुणे महानगर पालिका हे दोन विभाग एकमेकांशी समन्वय साधून काम करतील.

असा मिळवता येईल ई-पास

अत्यावश्यक सेवेमधील कर्मचार्यांची माहिती विविध विभागामार्फत मागविली असुन प्रवासाकरीता संबंधित व्यक्तीसाठी क्युआर कोड आधारीत ई – पास प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच पुणे ते दौंड व दौंड ते पुणे प्रवासाकरीता एकुण 31 पासेस देण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी www.punepolice.gov.in या लिंकवर जाऊन पास मिळवता येणार आहे. त्यासाठी कार्यालयाचे पत्र, आयडी कार्ड, फोटो, फिटनेस प्रमाणपत्र व इतर माहिती भरुन अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. पुणे पोलीस आयुक्तालया मार्फत अर्जाची पूर्णतः पडताळणी केल्यानंतर प्रवासाकरीता त्यांच्या नमुद संपर्क क्रमांकावर क्युआर कोड प्राप्त होईल.

पुणे शहर व पुणे महानगर पालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालय, पुणे विभागातील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय पुणे महानगर पालिका, आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड महानगर पालिका, व्यवस्थापकीय संचालक कार्यालय पीएमपीएमएल पुणे जिल्हा परिषद पुणे, निगडी प्राधिकरण, जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय बालेवाडी पुणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग पुणे इत्यादी कार्यालयांशी पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांच्या मार्फत त्यांच्या आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना लोकल ट्रेनचा प्रवासासाठी डिजीटल पास मिळविण्याकरीता आवश्यक कागदपत्रे व इतर सुचना संदर्भात माहिती पुरविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.