Daund : जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाचा खून अन् दरोडा; ‘पुणे एलसीबी’कडून 48 तासात गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – जीवनावश्यक वस्तूंची लातूर ते पुणे या मार्गावर वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचालकावर चाकूने वार करून खून केला. तसेच ट्रक चालकाकडील साहित्य दरोडा टाकून चोरून नेले. अन्य एका टेम्पोच्या काचा फोडून चालक आणि क्लिनरला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना 30 मार्च रोजी पहाटे दीडच्या सुमारास दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत सोलापूर-पुणे महामार्गावर उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणाचा छडा पुणे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या 48 तासात लावला असून दोघांना अटक केली आहे.

गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22, रा. बोरावकेनगर, दौंड), समीर उर्फ सुरज किरण भोसले (वय 19, रा. गोपाळवाडी-पाटस रोड, दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. काशिनाथ रामभाऊ कदम (वय 55, रा. ढोकी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख (वय 35, रा. कसबे तडवळा ता. जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कदम हे मालवाहतूक ट्रक (एम एच 25 / यु 4201)वर चालक म्हणून काम करत होते. ते लातूर येथून पुणे मार्केटयार्ड येथे डाळ घेऊन जात होते. सोलापूर-पुणे महामार्गावरून जात असताना दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत उड्डाणपुलाजवल आले असता ते लघुशंकेसाठी ट्रक बाजूला घेऊन थांबले. कदम लघुशंकेहून परत ट्रककडे येत असताना सब रोडने पायी चालत जाणाऱ्या पाच ते सहा अनोळखी इसमांनी त्यांच्या छातीवर चाकूने वार केले. तसेच त्यांच्याकडील तीन हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. या घटनेत कदम यांच्या छातीवर गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

त्यानंतर कदम यांच्या ट्रकच्या अगोदर त्याच ठिकाणी थांबलेला टेम्पोची (एम एच 12/ एच डी 1311) केबीनची काच फोडून टेम्पो क्लीनर महंमद मेहबुब पठाण (वय 49, रा. उस्मानाबाद) याच्या खिशातील मोबाईल व टेम्पोचा चालक अल्ताफ खैयुम पटेल याचे खिशातील रोख दोन हजार रुपये असा एकूण सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. क्लीनर पठाण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना दौंड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना, दौंड एसडीपीओ ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळी भेट देवून दौंड पोलीस स्टेशन, एलसीबी व बारामती विभागाची वेगवेगळी पथके नेमून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने देखील समांतर तपास केला. एलसीबीच्या पोलिसांनी पुणे, अहमदनगर, सोलापूर येथे जावून वेशांतर करून आरोपींची माहिती काढली.

दौंडचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्याकडील गुन्हे अन्वेषण (डीबी) पथकाची मदत घेवून पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या वस्त्या तपासण्यास सुरुवात केली. वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बनून रुग्णवाहिकेतून गेलेल्या पोलिसांनी गोपाळवाडी, पाटस रोड, दौंड येथे तपास सुरू केला. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी तब्बल दोन किलोमीटर आरोपींचा चित्तथरारक पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे घडलेल्या गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता आरोपींनी त्यांच्या साथीदारांसोबत मिळून सोलापूर रोडला मळद येथे पुलाजवळ थांबलेल्या ट्रकचालकास चाकूने भोकसून त्याच्याकडील पैसे व मोबाईल लुटले. त्याच्या पाठीमागे थांबलेल्या टेम्पोची काच फोडून त्यांच्याकडील मोबाईल पैसे लुटले. या घटनेच्या आदल्या दिवशी खडकी येथे एका कार्यालयासमोर थांबलेल्या छोटा हत्ती टेम्पोमधील एकाच्या डोक्यावर चाकूने मारुन पैसे, मोबाईल, बॅगा व महिलांचे दागिने लुटले. आठ दिवसापूर्वी वरवंड येथील एका हॉटेलसमोरुन मोटरसायकलची चोरी करुन हॉटेलमागे असलेल्या एमएसईबी पॉवरहाऊस येथील वॉचमनला गजाने डोक्यात मारहाण करुन मोबाईल व पैसे लुटल्याचेही आरोपींनी सांगितले.

10 दिवसापूर्वी लिंगाळी येथून एक पॅशन प्रो मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. तसेच सुमारे 15 दिवसापूर्वी स्वामीचिंचोली येथे एका हॉटेलसमोर लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघांपैकी एकाला कुऱ्हाडीने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल व पैसे लुटल्याचे आरोपींनी सांगितले आहे. याबाबत दौंड व यवत पोलीस ठाण्यात खुनासह दरोडयाचा एक, दरोडयाचा एक, जबरी चोरीचे दोन, चोरीचे दोन असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी गणेश चव्हाण हा सध्या शिक्रापूर व दौंड पोलीस स्टेशनच्या गंभीर गुन्हयात फरारी आहे.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस कर्मचारी अनिल काळे, रवि कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, ज्ञानदेव क्षिरसागर, काशिनाथ राजापुरे, दौंड पोलीस स्टेशनचे असिफ शेख, सुरज गुंजाळ, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे यांच्या पथकाने केली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तपास पथकाला बक्षीस जाहीर केले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.