Daund : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फौजदाराचे पलायन

एमपीसी न्यूज- बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेला उपनिरीक्षक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्यात मध्यरात्री घडली.

संतोष लोंढे असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २१) फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, रेल्वे प्रवासात तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी इंद्रजित महादेव यादव (रा. बालाजीनगर दौंड) याच्या विरुद्ध दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १३ ऑगस्ट रोजी रेल्वे सुरक्षा दलाचा उपनिरीक्षक संतोष लोंढे याने इंद्रजित यादव याच्या ऐवजी बनावट तरुणाला दौंड लोहमार्ग न्यायालयात आरोपी म्हणून उभे केले. न्यायाधीश जी एस वर्पे यांना शंका आल्यामुळे त्यांनी आरोपीचे ओळखपत्र सादर करण्यास सांगितले. त्यातून हा सर्व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

लोहमार्ग न्यायालयाने संतोष लोंढे याला ताब्यात घेऊन दौंड पोलिसांसमोर हजर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संतोष लोंढे याला सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्यात आणले असता शनिवारी (दि. १७) मध्यरात्री लघुशंकेला जात असल्याचे सांगत पलायन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.