Ind vs NZ Test Day: भारतीय संघाची आश्वासक सुरुवात

एमपीसी न्यूज :(विवेक कुलकर्णी) कसोटी क्रिकेट ज्या अनिश्चितेसाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे,त्याची क्षणोक्षणी अनुभूती देत आजच्या भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघामधील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे काही षटके अगोदरच संपला तेव्हा भारताने जडेजा व युवा श्रेयसच्या नाबाद शतकी भागीदारीने पहिल्या दिवसावर भारताची छाप सोडली.

कानपूर येथील ग्रीनपार्कच्या मैदानावर आज भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याला आज सुरुवात झाली.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेच्या नेत्रत्वाखाली भारतीय संघाने आज खेळताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.आज श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी मिळाली तर मयंक आगरवाल आणि शुभमन गील यांनी भारतीय डावाची सुरुवात केली.मात्र भारतीय संघाची सुरुवात आज खराबच झाली, मयंकला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही तो केवळ 13 धावांवर बाद झाला तेव्हा भारतीय संघाच्या फक्त 21 धावा झाल्या होत्या,त्याला जेमीसनने बाद केले त्यानंतर आलेल्या पुजाराने संथ खेळत गील बरोबर डाव बऱ्यापैकी सावरत दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची चांगली भागीदारी केली.त्यामुळे युवा शुभमन गील आक्रमक आणि आकर्षक ही खेळत होता. या जोडीने उपहारापर्यंत आणखी बळी जावू दिला नाही आणि या दरम्यानच गीलने आपले चौथे कसोटी अर्धशतकही पूर्ण केले.

मात्र या चांगल्या सुरुवातीला तो नेहमीप्रमाणे मोठ्या खेळीत रूपांतरित करू शकला नाही, आणि उपहारानंतर तो 52 धावा काढून जेमिसनचीच दुसरी शिकार ठरला. गीलला खूप प्रतिभावंत म्हटले जाते मात्र आठ कसोटी खेळल्यानंतरही त्याच्या नावावर अजूनही एक शतक सुद्धा लागले नाही, त्यामुळे प्रतिभावंत आहे पण तो ते अजूनही सिद्ध करु शकला नाही हे दुर्दैवाने सत्यच म्हणावे लागेल .गील बाद झाल्यानंतर काही वेळाने पुजारा सुद्धा 26 धावांवर साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला.त्याचा जोडीदारअजिंक्य रहाणे मागील कित्येक कसोटीत एक ऑस्ट्रेलिया मधला अपवाद सोडला तर रहाणे सुध्दा आपल्या दर्जाला जागू शकलेला नाही, आज मात्र कर्णधारपदाची जबाबदारी अंगावर असल्याने तो आपल्या नावाला आणि किर्तीला जागेल अशी अपेक्षा होती,त्यात त्याने सुरुवातही बऱ्यापैकी केली होती.

काही आकर्षक फटके त्याने मारल्यावर ही अपेक्षा आणखीनच दृढ होत चाललेली असतानाच घात झाला.त्याने अत्यंत खराब फटका मारून जेमिसनचा चेंडू यष्टीवर ओढवून घेतला आणि जम बसलेला असतानाही तो 35 धावा करून त्रिफळाबाद झाला.यावेळी भारतीय संघाची अवस्था एक बाद 82 वरून चार बाद 145 अशी बिकट झाली होती. आणि मैदानावर होते आपला पहिलाच सामना खेळणारा श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा. दुसऱ्या बाजूने जेमिसन आग ओकत होता,हा तोच जेमिसन आहे ज्याने कसोटी अजिंक्यपदाच्या अंतीम सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून भारताला पराभूत करण्यात मोठा वाटा उचलला होता, साहजिकच मायदेशी मजबूत असलेला भारतीय संघ यावेळी मात्र अडचणीत आला होता तर पाहुणा संघ मजबूत स्थितीत.

पण अशा कठीण प्रसंगी सुद्धा नवोदित श्रेयस अय्यरने मात्र कसलेही दडपण न घेता एखाद्या अनुभवी फलंदाजासारखी दमदार खेळी करत जडेजाच्या साथीने भारतीय डावाला आकार देताना स्थैर्यही मिळवून दिले.त्याने आक्रमकता ही दाखवली आणि बचाव सुद्धा,दुसऱ्या बाजूने अनुभवी जडेजाने सुद्धा सुंदर खेळत आपल्या अष्टपैलूंत्वाची प्रचिती देत श्रेयसला साथ ही दिली आणि मार्गदर्शनही केले,ज्यामुळे चार बाद 145 वरून आजचा खेळ थांबला तेंव्हा नाबाद शतकी भागीदारी करत धावफलकावर चार बाद 258 अशी सन्माजनक धावसंख्या झळकावत आजच्या दिवसावर आपली छाप सोडली.जडेजाने आपले अठरावे कसोटी अर्धशतक नोंदवताना 100 चेंडूत नाबाद 50 धावा काढल्या ज्यामधे सहा चौकाराचा समावेश आहे,तर श्रेयस अय्यरने आपल्या पदार्पणाला संस्मरणय करताना दिवसाखेर नाबाद तंबूत परतताना आकर्षक 75 धावा केल्या ज्यामध्ये सात चौकार आणि दोन उत्तुंग षटकार सामील आहेत.

न्यूझीलंड संघाकडून जेमिसन जबरदस्त गोलंदाजी करताना 15 षटकात केवळ 47 धावा देत तीन महत्वपूर्ण गडी बाद केले.
भारतीय संघ व्यवस्थापन मात्र आजच्या या कामगीरीवर नक्कीच खुश असेल आणि उद्या आजच्या या नाबाद जोडीकडून अशीच कामगिरीची अपेक्षा करत असणार.उद्या आणखी कमीतकमी दोनशे धावा भारतीय संघ जोडण्यात यशस्वी ठरला तर या कसोटीत भारतीय संघाची बाजू नक्कीच उजवी ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.