Dehuroad : कुंडमळ्यात सेल्फी काढताना वाहून गेलेली तरुणी 23 तासानंतर सापडली

एमपीसी न्यूज – देहूरोड शेलारवाडी जवळ असलेल्या इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला गेलेली तरुणी बहिणींसोबत सेल्फी काढताना पाय घसरून नदी पात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहता न आल्याने तरुणी वाहून गेली. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी पाचच्या सुमारास घडली. तब्बल 23 तास शोधकार्य केल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना आज (सोमवारी) चारच्या सुमारास घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला.

शालिनी चंद्राबालन (वय 17, रा. अजमेरा कॉलनी, आकुर्डी) असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आकुर्डी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकत होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी तिच्या बहिणीसोबत रविवारी इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला आली. नदी पात्राच्या बाजूने फिरत असताना शालिनी आणि तिची बहीण सेल्फी काढत होत्या. अचानक शालिनीचा पाय घसरला आणि ती नदीपात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ती त्या प्रवाहात पोहू शकली नाही. तिला वाचविण्यासाठी तिच्या बहिणीने देखील पाण्यात उडी मारली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघीही पाण्यात वाहून जाऊ लागल्या. आसपास असलेल्या लोकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी शालिनीच्या बहिणीला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र शालिनी कुठेही आढळून आली नाही. तात्काळ एनडीआरएफ च्या जवानांना बोलवण्यात आले. रविवारी दुपारपासून शोधकार्य सुरू होते. अखेर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास शालिनीचा मृतदेह सापडला. कुंडमळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर दगडी कपारीमध्ये तिचा मृतदेह सापडला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.