Talegaon Dabhade News : धक्कादायक! आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे तब्बल चार तास मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या गलथान आणि कर्तव्यापासून चालढकल करण्याच्या धोरणामुळे तब्बल चार तास मृतदेह शवविच्छेदनाअभावी पडून राहिला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 7) तळेगाव दाभाडे येथे घडला. मयत महिलेच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच टाहो फोडला. दरम्यान काही नातेवाईकांना भोवळ येण्यासारखे प्रकार घडले.

सीमा लहू वारींगे (वय 33, रा. वारंगवाडी, ता. मावळ, जि. पुणे) या सोमवारी (दि. 2) सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीवरून जात असताना एमआयडीसी रोड वडगाव येथील रेल्वे पुलाजवळ त्यांची दुचाकी घसरली आणि अपघात झाला. यात सीमा गंभीर जखमी झाल्या, त्यांच्यावर पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सहा दिवस मृत्यूंशी झुंज देत अखेर शनिवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचा मृतदेह दुपारी दीड वाजता तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांचा मोबाईल नंबर त्यांनी बंद केला होता. मृतदेहावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. पण या आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी असून एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्याने मृताच्या अनेक नातेवाईकांना चक्कर आल्याची घटना घडली.

डॉ. प्रवीण कानडे वैद्यकीय अधिकारी असताना मावळ तालुक्यातील मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात होते. मात्र आता मृत व्यक्तीचे नातेवाईक ‘आमच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करता का’ असा टाहो फोडत होते. नातेवाईकांनी अनेक पुढाऱ्यांना याबाबत माहिती दिली. चार तासाच्या प्रतीक्षेनंतर डॉ. राजेंद्र मोहिते आले त्यांनी सायंकाळी पाच वाजता मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

दुःखात असलेल्या नातेवाईकांना किती दुःख द्यावे याचे भान या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसले नाही व प्रशासनाचा वाचक राहिला नाही अशी प्रतिक्रिया नगरसेवक किरण म्हाळसकर,माजी सरपंच वामन वारींगे, प्रभाकर तुमकर, आबा वारींगे, संजय दंडेल, दीपक वारींगे, समीर जाधव, रामनाथ धुमाळ, देवा ठाकर आदींनी व्यक्त केली.

यावेळी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विजय चासकर, पोलीस हवालदार युवराज वाघमारे, सीताराम भवारी यांनी मृतदेहाचा पंचनामा करून चार तास प्रतीक्षा करत होते. आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची चर्चा मावळ तालुक्यात रंगली होती. दरम्यान, या बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल मृताच्या नातेवाईकांनी यानिमित्ताने यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.