Pimpri News : मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबतची माहिती दिली. भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील http://www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदवणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावीत, असे आवाहनही मदान यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी चॅटबॉट –

राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती ‘महाव्होटर चॅटबॉट’या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.