Pimpri: आरोग्य विभागाला महापौरांनी घेतले फैलावर; गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची ‘डेडलाईन’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र कचरा आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्या खाली केल्या जात नाहीत. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत, यावरुन महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय अधिका-यांना फैलावर घेतले. तसेच जी मदत पाहिजे ती आम्ही द्यायला तयार असून येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली आहे. शहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा असेही त्यांनी सुनाविले. 

महापौर राहुल जाधव यांनी दालनात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय अधिका-यांची बैठक घेतली. आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, आण्णा बोदडे, विजय खोराटे, स्मिता झगडे, आशा राऊत उपस्थित होत्या.

शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. दररोज कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्या खाली केल्या जात नाही. कचरा गाडी दररोज येत नाही. रस्ते साफ केले जात नाहीत. दुचाकीवरुन चालले तरी रस्त्यावरील धूळ उडत आहे. सार्वजनिक स्वच्छातागृहे साफ केली जात नाहीत. यावरुन महापौरांनी अधिका-यांना फैलावर घेतले. शहर स्वच्छ राहिले पाहिजे. त्यासाठी जी मदत लागेल ती मदत करण्यास आपण तयार आहोत. परंतु, शहर स्वच्छतेच्याबाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

कामचुकार अधिका-यांना वटणीवर आणले जाईल. जबाबदारी झटकणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर कचरा संकलन करणा-या गाड्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. सुट्टीच्या दिवशी देखील कार्यशाळा चालू ठेवावी, अशा सूचना त्यांनी कार्यशाळा विभागाला दिल्या.

आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, गाड्यांची कमतरता आहे. कार्यशाळेतून गाड्या लवकर दुरुस्त करुन दिल्या जात नाहीत. शनिवार, रविवार दोन दिवस कार्यशाळा बंद असते. त्यामुळे अडचणी येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.