Pune Crime News : खून की आत्महत्या? ‘त्या’ सॉफ्टवेअर अभियंत्यासोबत नेमकं काय झालं?

एमपीसी न्यूज – राहत्या घरात एका 47 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्याचे मित्र त्याने गोळी मारुन आत्महत्या केल्याचे जरी सांगत असले तरी त्या प्रकारात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी त्यांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास सुरू आहे. कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

गणेश यशवंत तारळेकर (वय 47) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तळेकर हे पुण्यातील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करतात. त्याचे लग्न झाले असून 14 वर्षाचा मुलगा देखील आहे. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत त्यांचा फ्लॅट आहे. पत्नी माहेरी असल्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांचे मित्र पार्टी करण्यासाठी घरी आले होते. पार्टी ऐन रंगात आली असताना गणेश यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे त्याचे मित्र सांगत आहे. आत्महत्या केल्यानंतर दोन मित्रांनी याविषयी कोणाला काही न सांगता पळ काढला.

दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. त्यामुळे गणेश यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.