Chakan : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या कारने दुचाकीला मागील बाजूने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला तर दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर भोसे गावाजवळ घडली. घटनेनंतर कारचालक पोलिसांना माहिती न देता पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिलीप उर्फ बाळू प्रभाकर कुटे (वय 40, रा. भोसे, ता. खेड), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अर्जुन निवृत्ती कुटे (वय 50) हे जखमी झाले आहेत. चाकण पोलिसांनी समीर अशोक दोंडे (रा. वडगाव मावळ, ता. मावळ) या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर 12 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडने एम एच 14 / सी झेड 9797 या कारमधून जात होता. रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात कार चालवताना समीरच्या कारने समोरच्या एम एच 14 / बी एच 4989 या दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात दिलीप यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर अर्जुन हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर आरोपी समीर अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला, असे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.