Deccan News : मगर आल्याच्या अफवेने भिडे पुलावर नागरिकांची गर्दी

तरूणाने केला पोलिस नियंत्रण कक्षाला फोन

एमपीसीन्यूज : डेक्कन नदीपात्रातील भिडे फुलाजवळ मगर दिसल्याचा फोन तरूणाने पोलिस नियंत्रण कक्षाला केला होता. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन खातरजमा केली. मात्र, पाण्यातील कचऱ्यात अडकलेली प्लास्टिकची बाटली मगर सदृश्य दिसल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नदीपात्रात मगर आल्याच्या अफवेने भिडे पुलावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

भिडे पुलावरून जाणा-या काही नागरिकांना आज दुपारच्या सुमारास नदीपात्रात मगर असल्याचे जाणवले. त्यामुळे एका तरूणाने पुणे पोलिस नियत्रंण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी येथे धाव घेत मगरीचा शोध सुरू केला.

परिसरातील नागरिकांना पोलिसांनी मगर कुठे दिसली अशी विचारणा केली. त्यावेळी नागरिकांनी पोलिसांना एक ठिकाण दाखवले. पोलिसांनी तेथे बारकाईने पाहणी केल्यानंतर पाण्यातील कच-यामध्ये प्लास्टिकची बाटली अडकली होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाटली हलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना मगरीचा भास झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे सांगितले. मगर आल्याच्या अफवेने भिडे पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. नदीपात्रातील पूलावरून प्रवास करणा-या प्रत्येकाकडून गर्दी झाल्याची विचारणा केली जात होती. त्यानंतर नदीपात्रात मगर असल्याचे ऐकताच खाली उतरून पाहण्यासाठी धडपड अनेकांकडून केल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.