Pune : जिल्ह्यातील 9 आमदारांची भूमिका निर्णायक; अजित पवारांसोबत जाणार की शरद पवारांना साथ देणार

भाजप 9, राष्ट्रवादी 10, काँगेस 2 : एकूण 21 आमदार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्याने सबंध देशभरात खळबळ उडाली आहे. विधानसभेत बहुमत सादर करताना पुणे जिल्ह्यातील 9 आमदार अजित पवार यांच्या सोबत जाणार की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ देणार, याची उत्सुकता लागली आहे.

वडगावशेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे, हडपसर चेतन तुपे पाटील, मावळ सुनील शेळके, शिरूर अशोक पवार, इंदापूर दत्तात्रय भरणे, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, खेड – आळंदी दिलीप मोहिते पाटील, जुन्नर अतुल बेनके, पिंपरी अण्णा बनसोडे आणि बारामती अजित पवार असे पुणे जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 10 आमदार निवडून आले आहेत. 2 काँगेस, तर भाजपचे 9 आमदार विजयी झाले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 21 आमदार आहेत.

इंदापूर मतदारसंघात सुरुवातीपासूनच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात दत्तात्रय भरणे यांना अजित पवार यांनी साथ दिली आहे. भरणे यांना पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्यापासून आमदारपदी निवडून आणण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. चेतन तुपे पाटील यांना पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेते करण्यात अजित पवार यांचाच शब्द महत्वपूर्ण होता. सुनील शेळके, सुनील टिंगरे, अतुल बेनके, अशोक पवार, दिलीप मोहिते पाटील, अण्णा बनसोडे या सर्वांना निवडून आणण्यापासून तिकीट वाटपापर्यंत अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. केवळ दिलीप वळसे पाटील यांचा अपवाद वगळता उर्वरित 8 ही आमदार अजित पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ‘मी साहेब यांच्या सोबत’ हे कॅम्पेन जोरात राबविण्यात आले होते. अनेक दिग्गज मंडळींनी राष्ट्रवादी सोडली. तरी काहीही फरक पडला नाही. त्यातील बहुतांशी नेत्यांचा दनकावून पराभव झाला. आता मात्र खुद्द अजित पवार यांनीच बंड पुकारल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.