Chakan : सत्ता कुणाला द्यायची हे ठरवा – नितीन बानगुडे पाटील

चाकणमध्ये शिवसेनेचा मेळावा

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे, त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र घडविताना सत्ता कुणाला द्यायची महाराष्ट्र पुढे घेऊन जाणा-यांना की मागे ठेवणा-यांना हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे मत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी चाकण (ता. खेड) येथे केले.

चाकणमध्ये बुधवारी (दि.१८) आयोजित करण्यात आलेल्या मी महाराष्ट्र निश्चय मेळाव्यात बानगुडे पाटील बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव, खेडचे आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, सुलभा उबाळे, पं.स. सभापती सुभद्रा शिंदे, चाकणचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, विविध गावचे सरपंच आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्राचा या भूमिकेतून पुढे गेल्यास सर्वश्रेष्ठ महाराष्ट्र घडवता येईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी शिवसेनेमुळे मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी खेड तालुक्यात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेताना विरोधकांवर जाणीवपूर्वक आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटून भूमिपूजन केल्याबद्दल टीका केली.

आमदार सुरेश गोरे यांनी आपल्या मनोगतात गेल्या पाच वर्षात खेड तालुक्याचे नेतृत्व करीत असताना कुणालाही त्रास दिला नाही याचे समाधान असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी प्रास्ताविक केले. उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्षे यांनी आभार मानले. या मेळाव्यासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. यामध्ये महिला भागिनींची संख्या लक्षणीय होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.