Final Year Exam : अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत निर्णय पुन्हा लांबणीवर, 18 ऑगस्टला पुढील सुनावणी

Decision on final year examination postponed again, next hearing on 18th August.

एमपीसी न्यूज – विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना तसंच काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज (शुक्रवारी) या याचिकेवर सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सगळे युक्तिवाद एकाच बाजूचे होते. पुढील सुनावणी यूजीसीची बाजू असेल.

यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सॉलिसेटर जनरल तुषार मेहता यांनी युजीसीची बाजू मांडली होती. त्यात त्यांनी परीक्षा रद्द करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नसल्याचं म्हटलं होतं. तसंच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

सध्याच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने व्यवहार्य नाही. बहुतांश कॉलेज, शैक्षणिक संस्था, हॉस्टेल हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत.

तसेच अनेक विद्यार्थी हे आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गावाहून येणे व त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे शक्य नसल्याने परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे, अशा आशयाचं पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला लिहिल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.