Pimpri : बांधकामे नियमितीकरणाची घोषणा ‘जुमला’ ठरू नये; घर बचाव समितीला भीती

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची केलेली घोषणा निवडणुकीचा ‘जुमला’ ठरु नये, अशी भीती घर बचाव संघर्ष समितीने व्यक्‍त केली. 

निवडणूक आली की घोषणा केल्या जातात. त्या घोषणांना प्राधिकरण प्रशासन झुगारुन लावत असल्याचा आरोप करत घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुन्हा तेच प्रश्‍न उभे केले जातात आणि त्यावरच घोषणा होतात, असा इतिहास आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत घरांचा प्रश्‍न गेल्या 35 वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. निवडणुका जवळ आल्या की घरे नियमित करण्याची घोषणा होते.

घोषणा झाली की निवडणुकीपर्यंत केवळ प्रशासनाचे कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार सुरू होतात. निवडणुका पार पडल्या की स्थानिक प्राधिकरण शासनाच्या आदेशाला पूर्णतः झुगारुन देते. असाच इतिहास गेल्या अनेक वर्षांपासून प्राधिकरणवासीय अनुभवत आहेत. कायदेशीर बाबींचा आधार घेऊन मुख्यमंत्री आणि नागरिकांची दिशाभूल करायची व स्थिती पुन्हा ‘जैसे थे’  ठेवायची असे धोरण प्राधिकरण प्रशासनाचे असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.