Talegaon Dabhade News : शहराचा ऐतिहासिक ठेवा जपणा-या ‘त्या’ तीन कामांचा लोकार्पण सोहळा लवकरच

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहराचा ऐतिहासिक ठेवा जपणारी तीन कामे शहरात सुरु आहेत. शहराच्या प्रवेशद्वारावर सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वार, शिवशंभो शिल्प आणि बेटी बचाव शिल्प या तीन कामांचा यात समावेश आहे. ही तिन्ही कामे अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात त्याचा लोकार्पण सोहळा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.          

तळेगाव ही ऐतिहासिक नगरी आहे. येथे इतिहासाच्या पाऊलखुणा असून सध्या नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या प्रवेशद्वारावर ‘सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वारा’चे काम चालू आहे. या कामासाठी नगरपरिषद फंडातून सुमारे 66 लाख रुपयांचा निधी निश्चित केलेला आहे. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. या गुढीपाडव्या पर्यंत हे काम पूर्ण होण्याचे नगर परिषद प्रशासनाचे नियोजन आहे.

तळेगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर ‘शिवशंभो’ या ऐतिहासिक शिल्पाचे काम चालू असून यासाठी नगर परिषद फंडातून 1 कोटी 71  लाख रुपये स्वनिधी ठेवलेला आहे तर याशिवाय कडोलकर कॉलनीच्या मुख्य चौकात 31 लाख रुपये खर्चाची तरतूद असलेले ‘बेटी बचाव शिल्प’ चे काम देखील वेगाने चालू असून ते येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.

शहरातील ही महत्त्वाकांक्षी व शहराला नवीन ओळख करून देणारी ऐतिहासिक कामे पूर्ण करण्यासाठी स्वतः मुख्याधिकारी सतीश दिघे व शहर अभियंता मलिकार्जुन बनसोडे विशेष लक्ष देत आहेत.

या ऐतिहासिक कामांना सन 2019 मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती. परंतु मधल्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यामुळे कामांची गती मंदावली होती. आता ही कामे जोमाने हाती घेतल्याने लवकर पूर्ण होऊन तळेगावकरांना पाहावयास मिळतील.असा अंदाज सुरु असलेल्या कामाच्या गतीवरून व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.