Pune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीतून एकूण 97 रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यातील 51 टाटा विंगर अँब्युलन्स टाटा मोटर्सच्या वतीने तयार करण्यात आल्या आहेत.

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हा परिषदेतर्फे 14 व्या वित्त आयोगाच्या (ग्रामपंचायत) तरतुदींनुसार 51 नवीन रुग्णवाहिकांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी लोकार्पण करण्यात आले. कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी टाटा मोटर्सने या विंगर रुग्णवाहिका विकसित करून दिल्या आहेत.

पुण्यातील विधानभवनात झालेल्या समारंभात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण समिती सभापती सारिका पानसरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र देशमुख, शासकीय विक्री विभागाचेआनंद कुमार, व्यावसायिक विक्री विभागाचे व्यवस्थापक (महाराष्ट्र) दर्शन भोसले, राज्य सेवा व्यवस्थापक विजय कुमार आदी  उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीतून एकूण 97 रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यातील 51 टाटा विंगर अँब्युलन्स टाटा मोटर्सच्या वतीने तयार करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी प्रातिनिधीक वाटप करण्यात आले. या रुग्णवाहिकांच्या डिझेल आणि ड्रायव्हरचा खर्च जिल्हा परिषद करणार आहे.

अजित पवार म्हणाले की, रुग्णवाहिकेची गरज कोणाला लागू नये, पण गरज असताना रुग्णवाहिका मिळाली नाही, असेही होता कामा नये. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील रुग्णवाहिकांची उपलब्धता या निमित्ताने वाढविण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

मागील 6 महिन्यांच्या कोरोना संसर्गाच्या काळात आपण अनेक जिवाभावाची माणसे गमावली आहेत. कितीही दणकट माणसे असली तरी कोरोनामुळे खचून जातात. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठीच राज्य शासनाच्या वतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे पवार म्हणाले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे कार्यक्रम घेता येत नाही. पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी काम सुरू आहे.

पुणे जिल्हा परिषदेने अतिवृष्टी अशा विविध संकट काळात मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 14 व्या वित्त आयोगातून 97 रुग्णवाहिका घेतल्या आहेत. त्यातील 51 रुग्ण वाहिकांचे तालुक्यात आज प्रायोगिक वाटप केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनावरील उपचारांसाठी वापरण्यात येणारी आवश्यक इंजेक्शन शरद पवार उपलब्ध करून देत आहेत. पुणे जिल्ह्यातील आता मास्क न वापरणाऱ्यांना 500, तर थुंकणाऱ्यांवर 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत साडे सात कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी वेळी दिली.

कोरोना संसर्गाच्या काळात पुणे जिल्हा परिषदेने या रुग्णवाहिका पुरविण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल टाटा मोटर्सच्या वतीने शासनाचे तसेच जिल्हा परिषदेचे आभार मानण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.