Pune: स्मार्ट नव्हे तर मंदगतीची तीन वर्षपूर्ती : दीपाली धुमाळ यांचा भाजपवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज – पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपने शहर स्मार्ट करणे तर सोडाच विकासाला खीळ घातली आहे. केंद्र सरकारच काय, पण आता महापालिकेतील भाजप नेतेही स्मार्ट सिटीचा उल्लेख करण्यास घाबरू लागले आहेत, अशा शब्दांत महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी हल्लाबोल केला.

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी एचसीएमटीआर या महत्वाकांक्षी प्रोजेक्टची निविदा काढली. परंतु, त्यामध्येही हे काम तत्कालीन भाजप सरकारच्या मर्जीतील विशेष कंपनीला मिळावे यासाठी प्रयत्न केले गेले. चोवीस तास पाणी योजनेच्या निविदाही मर्जीतील कंपनीला मिळाव्यात या पद्धतीने काढल्या गेल्या. कात्रज कोंढवा रस्ता, कचरा प्रक्रिया प्रकल्प, जलपर्णी काढण्याची कंत्राटे यातही पुणेकरांपेक्षा ठेकेदारांचेच हित जपण्यात भाजपची तीन वर्षाची सत्ता खर्ची पडली आहे.

जायका कंपनीकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून नदी सुधार योजनेसाठी 900 कोटी रुपयांची घोषणा झाली. या घोषणेला चार वर्षे उलटली. या योजनेच्या श्रेयासाठी भाजपच्या मंत्र्यांचे नागरी सत्कार झाले. मात्र, अद्याप या योजनेच्या कामाची सुरुवात झालेली नाही. या कामाच्या चढ्या दराने आलेल्या निविदा मंजूर करण्यासाठी महापालिकेवर केंद्राकडून दबाव आणला जात आहे. या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्याची हिंमत सत्ताधारी दाखवू शकलेले नाहीत.

दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षी जास्त पाऊस पडुन सुध्दा धरण क्षेत्रात पाणी असुन सुध्दा, अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. हे सुध्दा भाजपाचेच अपयश आहे. २४x७ या योजनेचा फज्जा उडाला आहे.तसेच भामा-आसखेड धरणाचे पाणी लवकरच शहरात आणु असे म्हणणा-या भाजपच्या मंत्र्यांची घोषणा अजुनही अद्यांतरीच आहे त्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही.

केवळ घोषणाबाजी करण्यात धन्यता मानून कागदी घोडे नाचवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहर स्वच्छता स्पर्धेच्या नावाखाली संपुर्ण पुणे शहरात भिंती रंगवण्याचे काम जोरात केले आहे.  सल्लागार आणि राडारोडा उचलण्याच्या नावाखाली  महापालिकेची तिजोरी मात्र ‘ साफ ‘ केली आहे. नियोजन आणि निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने झोपडपट्टी पुनर्वसन, पथारी व्यावसायिक पुनर्वसनाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. गरिबांचे रोजगार घालवून त्यांचे   ‘बुरे दिन’ आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुणेकर माफ करणार नाहीत. भाजप सत्ताधारी यांनी पुण्यामध्ये शिवसुष्टी उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणत्याही प्रकारची अस्मिता वाटत नाही. फक्त राजांच्या नावावर मते मागुन सत्ता मिळवणे व सत्तेत आल्यावर त्यांचे विस्मरण करणे हीच मानसिकता दिसून येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.