Talewade news:  ‘डिअर पार्क’च्या जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण!

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश, राज्य शासनाच्या वन विभागाचा महत्त्वाकांक्षी निर्णय

एमपीसी न्यूज – राज्यातील पहिला डिअर पार्क आणि प्राणी संग्रहालयाच्या आरक्षित जागेचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या वनविभागाने घेतला आहे. याबाबत गुरुवारी महसूल व वनविभागाने अद्यादेश जारी केला.
भोसरी विधानसभा मतदार संघात असलेल्या तळवडे येथे पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखड्यानुसार सर्व्हे नं. १ ब मध्ये हरिण उद्यान (डिअर पार्क)/ प्राणी संग्रहालयाचे आरक्षण आहे. मात्र, ही जागा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या ताब्यात होती. परिणामी, हा प्रकल्प सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासनाला तांत्रित अडचणी येत होत्या.

दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी 2016  पासून ‘डिअर पार्क’ आरक्षण विकसित करण्यासाठी जागा महापालिकेकडे हस्तांतरित करावे, याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल व वनविभागाकडे वारंवार मागणी केल्यानंतर अखेर आज (17 डिसेंबर 2020) शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे बंधन!
तळवडे येथे तब्बल 56  एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिअर पार्क साकारणार आहे. त्याचे काम 2021 मध्ये सुरू होईल. अवघ्या 3 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करावा, असे बंधन वन विभागाने अर्थात राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला घातले आहे. देश-विदेशातील पर्यटकांना पिंपरी-चिंचवडमधील डिअर पार्क आकर्षित करणार आहे. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे.

महापालिका विकास आराखड्यानुसार तळवडे येथील जागेवर डिअर पार्क / प्राणी संग्रहालयाचे आरक्षण आहे. संबंधित आरक्षण वनविभागाकडून हस्तांतरित केल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पहिले डिअर पार्क/ प्राणी संग्राहलयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात एक-दोन मोठे प्रकल्प असलेल्या आरक्षणांचा विकास होत आहे. पण,  रेडझोनच्या जाचक अटींमुळे तळवडे भागात अनेक वर्षांपासून डिअर पार्कचा प्रकल्प प्रलंबित होता. याची खंत कायम होती. संबंधित आरक्षण हस्तांतरित करण्याच्या मागणीला अखेर यश आले. डिअर पार्कमुळे पर्यटन विकासासह रोजगार निर्मितील होईल, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.