Cantonment Board News : ‘कँटोन्मेंट’च्या कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाच लाखांचे विमा कवच : संरक्षणमंत्री

कँटोन्मेंट भागात केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी नको

एमपीसी न्यूज – ‘छावणी कोविड योद्धा संरक्षण योजना’ या जीवन विमा निगमतर्फे असलेल्या समूह विमा जीवन विमा योजनेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शुभारंभ केला. या योजनेमुळे देशभरातील 62 कँटोन्मेंट बोर्डमधल्या 10 हजार कर्मचाऱ्यांना कोणत्याही दुर्घटनेशी सामना करण्यासाठी पाच लाखांचे विमा कवच मिळणार आहे. या योजनेचा लाभ डॉक्टर आणि पॅरामेडिक्स, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना होईल, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली.

संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण सामग्री महासंचालनालय (DGDE) यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या (CSS) अंमलबजावणीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने नवी दिल्ली येथे नुकताच देशभरातील 62 कँटोन्मेंट बोर्डांसाठी वेबीनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारचे उद्‌घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले.

देशभरातील सर्व 62 कँटोनमेंट बोर्डचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासंचालक या दोन दिवसांच्या वेबिनारमध्ये सहभागी होत आहेत. केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, त्यासाठीचा निधी पुरवठा आणि कँटोनमेंट भागातील रहिवाशांसाठी त्याद्वारे जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचे मार्ग समजून घेता यावेत या उद्देशाने वेबिनार आयोजित केला आहे.

केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ विना व्यत्यय घेता यावा आणि कॅन्टोन्मेंटमधल्या 21लाख रहिवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने वेबिनार हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले.

आत्मनिर्भर भारत या मोहिमेत संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारामुळे आयात होणाऱ्या वस्तूंच्या यादीवर प्रतिबंध लागला आहे. तसेच पुढील आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीने नवनिर्मितीचे सरकारकडून स्वागत असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.

गृहबांधणी आणि शहरी व्यवहार मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, महिला आणि बाल कल्याण मंत्रालय यामधील संयुक्त सचिव नोडल अधिकारी यांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला. संबंधित राज्य कार्य संचालक, संबंधित राज्य विभागांचे मुख्य सचिव हे सुद्धा वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

केंद्र पुरस्कृत योजनांचा परीघ वाढवणे आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे कँटोन्मेंट भागांपर्यंत पोहोचता यावेत यासाठी प्रत्येक कँटोन्मेंट बोर्डला या योजना पुढे नेण्याच्या दृष्टीने या वेबिनारमधील चर्चासत्रे उपयुक्त ठरली.

कँटोन्मेंट भागात केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी नको

देशभरातील कँटोन्मेंट भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री निवारा योजना, स्मार्ट शहरे उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती भोजन योजना यासारख्या अनेक कल्याणकारी योजना केंद्र सरकारकडून राबिण्यात येत आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहता कामा नये, असे राजनाथ सिंग म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.