फरक युद्धकाळातील परिस्थितीमधला… ब्लॅकआऊट ते लॉकडाऊन!

भारताने तीन मोठी युद्ध अनुभवली पण त्या युद्धांच्या काळातील परिस्थिती आणि आता कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या काळातील परिस्थिती यात खूप फरक आहे. या दोन्ही परिस्थिती अनुभवलेल्या ज्येष्ठांशी गप्पा मारून एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधी स्मिता जोशी यांनी घेतलेला हा आढावा….

फरक युद्धकाळातील परिस्थितीमधला… ब्लॅकआऊट ते लॉकडाऊन!

आजकाल जिकडे बघावं तिकडे फक्त आणि फक्त कोरोनाचीच चर्चा आहे. अर्थातच हे संकट न भूतो न भविष्यति असंच आहे. पण यापेक्षाही मोठ्या संकटांचा सामना केलेली मागची पिढी आजही मजेत आहे. मी ज्या संकटाची गोष्ट करतेय ते म्हणजे युद्धाचा काळ. भारतीयांना स्वातंत्र्यानंतर तीन मोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले. भारत-पाकिस्तान, भारत-चीन, नंतर पुन्हा भारत-पाकिस्तान अशी ही तीन मोठी युद्धे. त्यानंतर कारगिलचे युद्ध झाले, पण त्याची लौकिकार्थाने आपल्याला सामान्य जनतेला झळ लागली नाही.

ही तीन मोठी युद्धे अनुभवलेली एक पिढी आत्ता हे कोरोनाविरुद्धचे वेगळे युद्ध देखील अनुभवत आहे. त्यांच्यासाठी हे खरंतर अगदी क्षुल्लक आहे, असे त्यांच्याशी बोलताना नक्कीच जाणवले. त्यावेळी अनेक गोष्टींचे दुर्भिक्ष्य होते. सामाजिक संदर्भ वेगळे होते. तरीदेखील त्यांनी त्या संकटाचा धीराने मुकाबला केला. नकळतपणे का होईना त्यांना अनेक गोष्टींची चणचण त्यावेळी जाणवत होती.

पण त्याचा त्यांनी बाऊ केला नाही. पण आज ही जी घरात बसणे ही मोठ्ठी अडचण मानली जाते आणि त्यामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. सगळं संपलं ही भावना प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाली आहे. त्याचे अनेक वेगवेगळे परिणाम दिसू लागले आहेत.

मुळात हे सगळं निर्माण झालं आहे ते सर्वजण चंगळवादाच्या मागे लागल्यामुळे, असं म्हटलं तर वावगे होणार नाही. आजकाल आपल्याला एखादी गोष्ट नाही हे ऐकण्याची सवय राहिलेली नाही. मला जे हवं ते मला मिळालं पाहिजे हे अगदी लहान बाळाला देखील कळतं. आणि त्याला जे हवं ते देण्यासाठी त्याचे आईबाबा सदैव तत्पर असतात. त्यामुळे हा चंगळवादाचा भस्मासूर आपल्याला वेढून राहिलेला आहे.

1971 चं युद्ध कळण्याचे माझे तेव्हा वय नव्हते. पण त्यावेळचा ब्लॅकआऊट मला चांगला आठवतो. आज हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे घरात अडकून पडल्यामुळे बाहेर पडण्यासाठी अगदी आतुर झालेली सध्याची तरुण पिढी बघितली की त्यावेळी तरुण असलेल्यांनी कसे काय दिवस काढले असतील, हे जाणून घ्यावेसे वाटले.

आधी 1962 ला भारत-चीनचे युद्ध झाले. त्यानंतर लगेचच 1965 मध्ये भारत- पाकिस्तानचे युद्ध झाले. लागोपाठ झालेल्या या युद्धांमुळे देशाची आर्थिक परिस्थिती अगदी डबघाईला आली होती. त्यावेळी लग्नांसारख्या समारंभांना देखील मनाई होती. अगदी मोजक्या लोकांच्या म्हणजे पंचवीस – तीस लोकांच्या उपस्थितीत लग्न करावे लागे. तसेच जेवणावळींना बंदी होती.

त्यावेळचे आपले पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी लोकांना एक वेळ जेवणाचे आवाहन केले होते. त्यानंतर मग देशात हरित क्रांती झाली. आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करु लागला अशी आठवण एलआयसी मधून निवृत्त झालेले विलास फडके यांनी आवर्जून सांगितली.

त्यावेळी ते शिकत होते. एका लहान खेड्यातले जीवन त्यावेळी कसे होते हे सांगताना ते म्हणाले की, आत्तासारख्या चैनीच्या कल्पना त्यावेळी नव्हत्याच. दोन वेळचे भरपूर जेवायला मिळणे हे आनंदाचे होते. चणचण नव्हती आणि आहे त्या परिस्थितीत सुख मानणे हेच संस्कार तेव्हा घरातून मिळत असत. छोट्याशा गावात एकमेकांना सगळे ओळखत असत. आत्तासारखं तुटक वागणं तेव्हा लोकांच्या गावीदेखील नव्हतं. त्यामुळे मानसिक समाधान हीच खूप मोठी पुंजी होती.

तुमच्या जवळ पैसा किती आहे यापेक्षा तुमची लोकांमध्ये पत किती आहे याला महत्त्व होतं. आणि आपण आता हेच विसरलो आहेत. पैशाला सर्वस्व मानणा-या नवीन पिढीला आता हळूहळू पैशांपेक्षाही वेगळं काहीतरी विश्व असू शकतं याची या कोरोनाने जाणीव करुन दिली आहे. सध्या सगळ्यांची ईझी मनीकडे  ओढ आहे. आणि साहजिकच त्या पैशाने समाधान विकत घेता येत नाही.

त्यानंतर आलेल्या 1971 च्या युद्धाने देखील अनेक नव्या गोष्टींची लोकांना ओळख करुन दिली. मला त्यावेळचं थोडसं आठवतंय. ते युद्ध जरी पंधरा दिवसच होतं. तरी शत्रूच्या विमानांना आपला ठावठिकाणा कळू नये म्हणून ब्लॅकआऊट करण्यात येत असे. आत्ताच्या पिढीला हे ब्लॅकआऊट म्हणजे काय हे माहितच नाही. त्यावेळी अगदी घराच्या खिडक्यांच्या काचांना देखील काळा कागद लावावा लागे किंवा खास जाड काळ्या कापडाचे पडदे शिवले होते. रात्रीच्या वेळी बाहेर कोणत्याही प्रकारचा उजेड जाणार नाही याची दक्षता घेतली जाई. मोठ्यामोठ्या शहरात देखील ही काळजी घेतली जात होती. त्याचबरोबर बाहेर कर्फ्यू देखील होताच.

आत्तासारखी लोकांना बाहेर जाण्यावर देखील बंदी होतीच. पण या गोष्टींचा त्या नागरिकांनी बाऊ केला नाही. कारण ज्याला त्याला आपल्या जीवाची किंमत होती असे आत्ताची ही बेजबाबदार परिस्थिती बघितल्यावर खेदाने म्हणावे लागतेय. त्या दिवसांच्या आठवणी सांगताना शुभदा चाफेकर सांगत होत्या, की त्यावेळी माझे पती आसाममध्ये होते. शुभदा यांचे पती डॉ. अर्जुन चाफेकर लष्करात वैद्यकीय सेवा करत होते. त्या म्हणाल्या की, ते आसाममध्ये आणि मी पुण्यात होते. ब्लॅकआऊट तर होताच. अन्नधान्य देखील मोजकेच मिळे. पण फरक हा होता की त्यातदेखील आम्ही आनंदाने राहात होते. मनात कोठेही खंत नव्हती.

किंवा काही त्यासाठी काहीही करुन ते मिळवायचेच अशी भावना देखील नव्हती. आत्ता लोकांनी ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्याच पाहिजेत हा अट्टाहास चालवलाय ते बघितले की खूप खेद होतो. आम्ही त्यावेळी सगळ्या गोष्टींना सामोरे गेलो, जीवावर लढून आपल्या जवानांनी स्वातंत्र्य मिळवले ते याचसाठी का असे खेदाने म्हणावेसे वाटते. आज सरकार ओरडून ओरडून सांगतेय, घराबाहेर पडू नका, गर्दी करु नका पण लोकांना त्याचे गांभीर्यच नाही.

अर्थातच या सगळ्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्य आणि चंगळवाद कारणीभूत आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागतेय. आणि या चंगळवादाचे बीज आपण ज्यांच्याकडून घेतलेय ती अमेरिका आज कोरोनाच्या महापुरात अक्षरशः धुवून निघाली आहे. इतकी की आता त्यांनी मृत्यूचे आकडे दाखवणेच बंद केले आहे.  आता लोकांना चिंता पडलेय ती आम्ही महिनाभर घरात कोंडून पडलोय, बाहेर मॉलमध्ये, हॉटेलिंग, उगाचच गाड्या उडवणे करता येत नाही, आता आमचं कसं होणार.

पण याचा सकारात्मक उपयोग करता येईल याचा विचार कोणी पटकन करतच नाही. कमी रिसोर्सेसमध्ये चांगल्या दर्जाचे कसे जगता येईल याचा सकारात्मक विचार करणे आत्ता खूप गरजेचे आहे. तरच आपण यातून नक्की तरुन जाऊ. आपल्याकडे असे म्हणतातच ना महापुरे झाडे जाती,  तेथे लव्हाळे वाचती…

– स्मिता जोशी 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.