Pimpri News: वृक्षतोड, छटाईत नियमांचे होत नाही पालन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून धोकादायक, रहदारीला अडथळा, रस्ते, पुलांच्या कामांना अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास, छटाईस परवानगी देताना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. तोडीसाठी परवानगी देताना जाहिरात दिली जात नाही. झाडावर नोटीसही चिटकवली जात नसल्याचा आक्षेप पर्यावरण प्रेमींकडून घेतला जात आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मागील पाच वर्षात 14 हजार 348 झाडे तोडण्यास परवानगी दिली. तर, 6105 झाडांच्या पुनर्रोपणास परवानगी दिली आहे. आकडेवारीवरुन वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. कोणतेही झाड तोडताना सरकारने नियमावली आखून दिली आहे. कोणतेही झाड तोडायचे असल्यास त्याबाबतच्या परवानगीसाठी वृक्ष प्राधिकरणाकडे लेखी अर्ज करावा लागतो. झाडाचे वर्णन व स्थिती दर्शविणारा जागेचा नकाशा आणि झाड तोडण्याची कारणे जोडावी लागतात. अर्ज मिळाल्यावर वृक्ष अधिका-यास व्यक्तिश: झाडाचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळी जाणे अपेक्षित आहे. अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत चौकशी करुन वृक्ष प्राधिकरणाकडे अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

वृक्ष अधिका-यांनी स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात देवून, तसेच तोडणे आवश्यक असलेल्या झाडांच्या ठळक भागावर नोटीस चिटकवून योग्य ती जाहीर नोटीस देणे आवश्यक असते. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या कालावधीत सशर्त किंवा विनाशर्त परवानगी देवू शकेल किंवा ती नाकारु शकेल. तथापि, अशी परवानगी देण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत कोणतेही झाड तोडण्यास येणार नाही. परंतु, वृक्ष प्राधिकरणाच्या मते ते झाड मेलेले असेल. किंवा त्यावर रोग पडला असेल. किंवा वादळ, वा-याने झाड पडले असेल तर किंवा त्यामुळे जीवीतास, मालमत्तेचा धोका असल्यास किंवा त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यास आणि अशा परवानगीविरुद्ध कोणताही आक्षेप घेण्यात आला असेल तर ती बाब पुनर्विचारासाठी वृक्ष प्राधिकरणासमोर मांडण्यात येईल. कोणी आक्षेप घेतला असेल. अशा व्यक्तीला तिचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर दोन आठवड्याच्या आत निर्णय घेण्यात येईल, अशी प्रक्रिया आहे.

_MPC_DIR_MPU_II

पंरतु, या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. नोटीस चिटकवली जात नाही. वृत्तपत्रात जाहिरात दिली जात नाही. नियमांचे सर्रोसपणे उल्लंघन होत आहे. प्रक्रियेचे पालन केले जात नाही. त्याकडे अधिका-यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आक्षेप पर्यावरण प्रेमींकडून घेतला जातो. त्यामुळेच वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असल्याचा त्यांचा आरोप आहे. अनेकदा झाड छटाईस परवानगी दिली असताना बुंध्यापासूनच झाड कापले जात असल्याचे अनेकदा दिसून येते. नगरसेवकांचा वाढता हस्तेक्षप देखील अधिकचा असतो. यामुळे शहरातील वृक्षतोड वाढलेली दिसून येत आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडत आहे. याकडे अधिका-यांनी वेळीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पर्यावरणाची पूरती वाट लागण्यास जास्त दिवस लागणार नाहीत.

या भागातील झाडे तोडण्यास दिली जाते परवानगी!

पालिकेच्या जागेवरील, पुल, रस्त्यांच्या कामाला अडथळे ठरत असलेली, गृहनिर्माण सोसायट्यांमधील भिंत, वाहनतळाला अडथळा,  कंपाऊड वॉलमध्ये येत असलेले, किड लागलेले वृक्ष,  बांधकामाला अडथळा, विद्युत वायर जात असलेले झाडे, रोडच्या कडेली झुकलेली  वृक्ष पूर्ण काढण्याची मागणी केली जाते. तर,  मोशी, चिखली या ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या बांधावरील वृक्ष तोडण्याची मागणी केली जाते. काटेरी बाभुळ, सुबाभुळ, कडुनिम, आंबा, नारळ,  बदाम, आंबा, सिल्व्हर ओक, नारळ, रामफळ, गुलमोहर, अंबर, चेहन, रबरट्री, परिजातक, बेल, आवळा, निलगिरी, फणस, आबांडी, अशोक, फायकस अशी झाडे काढण्याची परवानी नागरिकांकडून मागितली जाते. त्यातील काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी दिली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.