Bhosari : देहू-आळंदी पुणे पालखी महामार्गाला महेश लांडगे यांच्यामुळे चालना – नितीन काळजे

एमपीसी न्यूज – वारकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या देहू-आळंदी पुणे पालखी महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती असताना या रस्त्याच्या कामाला चालना दिली. सन 2018 मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले. पालखी महामार्गातील अडथळे कमी झाल्यामुळे सहा पदरी महामार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाला. वारकरी बांधवांच्या चेह-यावर त्यामुळे समाधान असल्याचे माजी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ च-होली येथे आयोजित बैठकीत माजी महापौर काळजे बोलत होते.

नितीन काळजे म्हणाले, देहू-आळंदी व पिंपरी-चिंचवडला संतांची थोर परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, महान गणेशभक्त श्री मोरया गोसावी असे अनेक संत या भूमीत होऊन गेले. दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी पिंपरी-चिंचवडमधून पंढरपूरला वारीसाठी जात असतात. वारकरी बांधवांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असलेल्या देहू-आळंदी पुणे पालखी महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. हे काम आमदार महेश लांडगे यांनी स्थायी समिती सभापती असताना मार्गी लावले. त्यामुळे लाखो वारकरी समाधान व्यक्त करत आहेत.

देहू-आळंदी पुणे पालखी महामार्गामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तसेच आळंदी येथे येणा-या भाविकांसाठी प्रशस्त मार्ग उपलब्ध झाला आहे. मरकळ व चाकण येथील एमआयडीसीसाठी हा जवळचा प्रशस्त मार्ग असणार आहे. वेगाने विकसित होणा-या दिघी, च-होली, वडमुखवाडी या भागाचे या प्रशस्त मार्गामुळे भाग्य उजळले आहे. या महामार्गाबरोबरच आळंदी बोपखेल रस्त्यावर नऊ बस स्टेशन्स उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 8.31 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामालाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रस्तावित बस स्टेशनमध्ये बीआरटी बस सेवेसाठी 3.5 मीटर रुंदीच्या स्वतंत्र मार्गिका, स्वयंचलित दरवाजे, प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त आसनव्यवस्था, चार बस थांबू शकतील एवढे प्रशस्त बस स्टेशन्स या सुविधा असणार आहेत. यामुळे प्रवाशांना आळंदी येथे बसने विना अडथळा प्रवास करता येणार आहे.

मरकळ व चाकण येथील एमआयडीसीसाठी जवळचा बीआरटीएस मार्ग म्हणून हा मार्ग नवीन पर्याय असेल. तसेच वेगाने विकसित होणा-या दिघी, च-होली, वडमुखवाडी भागातील बस प्रवाशांसाठी पुणे व भोसरी येथे येण्या-जाण्यासाठी विना अडथळा मार्ग उपलब्ध होणार असल्याचेही काळजे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.