Dehugaon : मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

Departure of Tukoba's palankhi in the presence of few Vaishnavas

एमपीसीन्यूज : जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखीने प्रस्थान आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे ठेवले. कोरोनाच्या संकटामुळे यंदा प्रथमच मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून तुकोबांच्या पालखीने  प्रस्थान ठेवले. शासनाने 50 वारकऱ्यांच्या समवेत आषाढी पायी वारीसाठी पालखी प्रस्थान सोहळ्याला परवानगी दिली असली तरी वारकरी आणि भाविकांमधील उत्साह कायम असल्याचे देहूनगरीत पाहायला मिळाले.

पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त प्रथेनुसार पहाटे चार वाजता काकडा आरती आणि साडेचार वाजता शिळामंदिराची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

पहाटे पाच वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिरात संस्थानच्या अध्यक्षांसह विश्वस्त विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तर पहाटे साडे पाच वाजता वैंकुठगमणे मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधिची महापूजा संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

सकाळी दहा वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याच्या काल्याचे किर्तन प्रितम महाराज मोरे देहूकर यांनी ‘तुझीया संगती | झाली आमुची निश्चिती ||’ या अभंगाचे निरुपन करीत काल्याच्या किर्तनाने अखंड हरिणाम सोहळ्याची सांगता झाली.

तत्पूर्वी सकाळी नऊच्या सुमारास सेवेकरी माऊली मसलेकर यांनी येथील घोडेकर सराफ यांनी चकाकी दिलेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिराच्या शेजघरातून मुख्यमंदिरात आणल्या.

या पादुका काल्याचे किर्तन झाल्यानंतर पालखीचे सेवेकरी माऊली मसलेकरांनी डोक्यावर घेऊन उपस्थित वारकऱ्यांसह टाळ मृदंगाच्या तालवर भक्तीमय वातावरणात मंदिराला प्रदिक्षिणा घालत भजनी मंडपात प्रस्थानासाठी आणल्या.

हा सोहळा मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांच्या शिवाय उपस्थित भाविकांसह सोहळा पार पडला.

भजनी मंडपात दुपारी 2.30 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरवात झाली. ग्रामोपाध्याय नारायण अत्रे यांनी धरती, वायू, अग्नी, जल, आकाश यांच्यासह विधीवत पाद्य व कलशपूजा केली. प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली.

त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके, प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार गीता गायकवाड, विक्रम महाराज माळवे यांच्यासह पासधारक वारकरी उपस्थित होते. पादुकांची विधीवत पूजा व आरती झाल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवण्यात आल्या.

पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार नामदेव गिराम यांच्यासह उपस्थित सेवेकऱ्यांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसादाने सन्मानीत करण्यात आले.

प्रथेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या.

महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्यानंतर सेवेकरी भोई तानाजी कळमकर, गुंडाप्पा कांबळे, नामदेव भिंगारदिवे, अनिल गायकवाड, नामदेव पवार यांच्यासह भाविकांनीही पालखीला खांदा दिला. तुतारी (शिंगाडा) धारक पोपट तांबे यांनी तुतारी फुंकली.

उपस्थित वारकऱ्यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’ असा जयघोष करण्यास सुरवात केला. या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला.

याच वेळी चौघडाही वाजविण्यात आला. पालखी भजनी मंडपातून बाहेर येताच सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये अधिकच उत्साह संचारला. त्यांच्या मुखातून आपोआपच अभंगाचे बोल बाहेर पडू लागले.

टाळ विना मृदंगाच्या तालावर भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांचे एक एक पाऊल पुढे पडत होते. देहूनगरी भक्तीमय झाली होती.

याच वेळी चौघड्याचे मानकरी बाळू पांडे यांनी चौघडा वाजविण्यास सुरवात करताच पालखीवर सेवेकरी दत्ता पवार यांनी छत्र धरले, सेवकऱ्यांनी जरी पट्टा, गरूड टक्के, चांदीची अब्दागिरी व पताका घेत मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून पालखी बाहेर पडली.

चोपदार नामदेव गिराम यांच्यासह उपस्थित सेवकऱ्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या घेत पालखी भजनी मंडपातून 3.30 वाजण्याच्या सुमारास देऊळवाड्यातील मुख्य मंदिरासह शिळा मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडली.

प्रथेप्रमाणे मंदिर प्रदक्षिणा झाल्या नंतर पालखी पालखी पाच वाजण्याच्या सुमारास किर्तन मंडपात विसावली. रात्री मंदिराच्या आवारातच भजनी मंडपात पालखी विसावणार आहे. तेथे प्रथेप्रमाणे रात्री देहूकर दिंडीचे किर्तन आणि जागर होणार आहे.

खासदार-आमदारांनी धरला फुगडीचा फेर

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार शेळके यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. या खासदार -आमदारांनी धरलेला फुगड्यांचा फेर सोहळ्याचे आकर्षण ठरले.

पालखी प्रस्थांसाठी मोजक्याच वैष्णवांची उपस्थिती

देहूगावातील श्री संत तुकाराम मंदिराच्या परिसरात प्रसन्न वातावरणात मोजक्या वैष्णवांनी पालखी प्रस्थांसाठी हजेरी लावली होती. मृग नक्षत्रात पालखी प्रस्थान होत असले तरी हवेत उष्मा जास्त होता. दुपार नंतर काहीसे हवामान ढगाळ झालेले होते. लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद, विणा आणि हरिनामाचा जयघोष करीत उपस्थित वारकऱ्यांच्या उपस्थित उत्साही वातावरणात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले.

भाविकांना व ग्रामस्थांना मंदिर परिसरात प्रतिबंध

कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर पालखीचे प्रस्थान असल्याने मुख्य मंदिर परिसरात कडोकोट बंदोबस्त होता. सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होऊ नये, यासाठी भाविकांना व ग्रामस्थांना मंदिर परिसरात प्रतिबंध करण्यात आला होता. गावामध्ये मंदिर परिसरसोडून ग्रामस्थांची कामे नियमितपणे सुरू होती.

निर्बंध असतानाही वारकऱ्यांमध्ये उत्साह

गेली 68 वर्षातील पहिल्यांदाच केवळ मोजक्याच भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान होत असले तरी या सोहळ्याचे साक्षीदार असल्याचा आनंद उपस्थित वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.